लोकशाहीवर विश्‍वास असणार्‍यांनी एकत्र यावे : पवार

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर ज्यांचा विश्‍वास आहे, ज्यांना देशाची लोकशाही मूल्यांचे रक्षण करायचे आहे, त्यांनी आता एकत्र आले पाहिजे, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले. पवार यांनी ट्वीट करत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी घेतलेल्या बैठकीचे स्वागत केले. मफसध्याच्या निराशाजनक स्थितीत ही बैठक आवश्यक होती , असे त्यांनी म्हटले आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पेगॅसस प्रकरण, कृषी कायदे आदी मुद्द्यांवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारला धारेवर धरले होते. सोनिया गांधी यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत विरोधी पक्षांच्या नेत्यांची ऑनलाइन बैठक बोलाविली होती. या बैठकीला देशभरातील 19 पक्षांचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्‍चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे एम. के. स्टॅलिन आणि झारखंडचे हेमंत सोरेन यांचा उपस्थित नेत्यांमध्ये समावेश होता.
यावेळी बोलताना पवार म्हणाले की, देशातील शेतकरी अनेक महिन्यांपासून आंदोलन करीत आहे, हे भारतासारख्या देशात दुःखद चित्र आहे. आर्थिक मंदी, कोरोना, बेरोजगारी, सीमा वाद, अल्पसंख्याकांचे प्रश्‍न यांसारख्या अनेक प्रश्‍नांचा देश सामना करीत आहे. त्यावर उपाय शोधण्यात सध्याचे सरकार अपयशी ठरले आहे. लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आता सर्वांनी एकत्र मिळून काम करण्याची गरज आहे.
त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम सुरू करायला हवा. सर्व मुद्द्यांचा एकावेळी निपटारा करण्यापेक्षा आपण प्राधान्यक्रम निश्‍चित करून सामूहिकपणे कार्य करायला हवे. देशाला राज्यघटनेवर विश्‍वास असलेले सरकार देण्याचे उद्दिष्ट आपल्यासमोर आहे. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन 2024 मधील लोकसभा निवडणुकीसाठी योग्यपद्धतीने नियोजन केले पाहिजे. हे मोठे आव्हान आहे पण, आपण संघटितपणे त्यावर मात करू शकतो. प्रत्येकावर पक्षीय बंधने आहेत परंतु ती बाजूला ठेवून संघटितपणे उभे राहण्याची वेळ आता आली आहे.फफ अशी साद सोनिया गांधी यांनी देशभरातील विरोधी पक्षांना घातली.

Exit mobile version