महावितरणमध्ये हजारो पदे रिक्त

| मुंबई | प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) ही आशिया खंडातील वीज वितरण क्षेत्रातील एक अग्रगण्य सार्वजनिक कंपनी म्हणून ओळखली जाते. मात्र, सध्या या देदीप्यमान कामगिरीमागे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण निर्माण झाला असून त्याचे मुख्य कारण म्हणजे राज्यभरात तब्बल 27 हजार 675 पदे रिक्त असणे हे आहे. महावितरणमध्ये राज्यात एकूण 81 हजार 468 मंजूर पदे असून, त्यापैकी केवळ 54 हजार 757 कर्मचारी कार्यरत आहेत. उर्वरित मोठ्या संख्येतील रिक्त पदांमुळे दैनंदिन कामकाज, वीजपुरवठा, तक्रार निवारण तसेच थकबाकी वसुलीवरही विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. राज्यातील तीन कोटी 17 लाखांहून अधिक कृषी, औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांना अखंड वीजपुरवठा करण्याची जबाबदारी महावितरण पार पाडत आहे. सोलर कृषी पंप बसविण्याचा जागतिक विक्रम, तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार कंपनीच्या नावावर असले तरी, प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. तांत्रिक संवर्गात मंजूर 45 हजार 803 पदांपैकी 18 हजार 506 पदे रिक्त आहेत. यामध्ये मुख्य तंत्रज्ञ 199, प्रधान तंत्रज्ञ 912, वरिष्ठ तंत्रज्ञ सहा हजार 601 आणि तंत्रज्ञ 12,313 पदांचा समावेश आहे.

Exit mobile version