महामार्ग चौपदरीकरणात हजारो वृक्षांची कत्तल

प्रवाश्यांची सावली आणि हक्काची जागा हरपली, नवीन वृक्ष लागवडीची मागणी
| पाली/बेणसे । वार्ताहर ।

मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या 84 किमी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील सहा -सात वर्षांपासूम संथ गतीने सुरू आहे. या मार्गावर वाकण नाक्यावर रस्त्याच्या कडेला असलेले भले मोठे वडाचे झाड रुंदीकरणासाठी तोडले. इतकेच नव्हे तर इंदापूर ते पळस्पे पहिल्या टप्प्याच्या चौपदरीकरण दरम्यान हजारो वृक्षांची बेछूट कत्तल झाली. या झाडाखाली ऊन आणि पावसात हक्काने उभे राहणार्‍या प्रवाश्यांची सावली आणि नैसर्गिक छत हरपले आहे. महामार्ग चौपदरीकरणा दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या तोंडावर झाडे लावल्यास अधिक उपयुक्त ठरतील अशी मागणी प्रवाशांनी केलीय.

वाकण नाक्यासह कोलाड व पुढे इंदापूर, माणगाव याठिकाणी नेहमीच प्रवाश्यांची व वाहनांची गर्दी असते. येथून पाली, खोपोली, पुणे व मुंबई तसेच कोकणाकडे गाड्या जातात. त्यामुळे वाकण या नाक्याला विशेष महत्व आहे. येथे पालीसह आजूबाजूच्या गावातील प्रवासी व विद्यार्थी या नाक्यावर गाड्यांची वाट पाहत उभे असतात. आजतागायत प्रवाश्यांना ऊन, वारा, पाऊस या पासून सरंक्षण मिळावे यासाठी येथे निवारा शेड उभी करण्यात आलेली नाही.

मुंबईकडे जाणार्‍या म्हणजेच उत्तर दिशेकडे जाणार्‍या प्रवाश्यांना हा प्रशस्त वड हक्काची जागा होती. एवढेच काय जणू काही हा वड प्रवाश्यांची निवारा शेडच होता. सर्वच प्रवासी या वडाच्या सावली खाली आसरा घेत कित्येक वेळ गाड्यांची वाट पाहत उभे राहत. पावसाळ्यात सुद्धा पावसाच्या पाण्यापासून हा वड प्रवाश्यांचे संरक्षण करत होता. मात्र आता हा वड महामार्गाच्या रुंदीकरणासाठी तोडला आहे. आणि प्रवाश्यांची हक्काची जागा, सावली हरपली आहे. एप्रिल ते जून पासून परिवहन मंडळाचे कर्मचारी प्रवाश्यांना गाड्यांमध्ये बसविण्यासाठी या झाडाच्या सावलीतच थांबत होते. मात्र वड तोडल्याने त्यांचेही हाल झाले आहेत. सध्या रणरणत्या उन्हात प्रवासी गाड्यांची वाट पाहत येथे उभे असतात. घामाच्या धारा पुसत वडाची आठवण काढतात. पुन्हा नव्याने वृक्षलागवड केली पाहिजे असे दत्ता तरे या प्रवाशाने सांगितले.

गेली अनेक वर्षे येथील झाडाच्या सावलीखाली उभा राहून गाड्यांची वाट पाहायचो. ऊन, वारा व पावसापासून या झाडाने कित्येक प्रवाश्यांचे संरक्षण केले आहे. आता हा वड तोडल्याने माझ्यासह सर्वच प्रवाश्यांची खूप गैरसोय होत आहे. -बशीर परबळकर, प्रवाशी

पक्षांचा आसरा गेला
वडावर अनेक पक्षांची घरटी होती. काही घरट्यांमध्ये पिल्ले देखील होती. वड तोडल्याने पक्षांचा आसरा नाहीसा झाला आहे. तसेच अनेक पक्षी वडाची फळे खाण्यासाठी देखील येत होते. त्यांचे खाद्य देखील आता संपुष्टात आले आहे. अनेक मोकाट गुरे देखील वडाच्या सावलीखाली थांबत होती त्यांचेही हाल झाले आहेत.

Exit mobile version