। आगरदांडा । प्रतिनिधी ।
100 वर्षांची परंपरा असणार्या मुरुड तालुक्यातील खारआंबोली गावातील हनुमान मंदिरात यात्रा उत्सवाला सुरुवात झाली असून, याठिकाणी हाजोरो भक्तगण यात्रा उत्सवात सहभागी होत आहेत. हनुमान जयंती निमित्त दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिक व ग्रामस्थ यात्रेसाठी येत असून, मानाच्या काठ्यांना आदराने बोलवण्याची प्रथा आहे. रात्री सडेदहा ते पहाटे 4 वाजेपर्यंत ही यात्रा भरते. त्यावेळी हर हर महादेवचा गजर करीत एकदरा, मिठागर, नांदला, कोंड आंबोली, वरची वावडुंगी, शिघ्रे आदिवासीवाडी तिसले वाडी, अशा अनेक मानकरी गावातून मिरवणुक काढून मानाच्या काठ्या यात्रेत येतात. या काठ्यांना शिवलिंगाचा आकार असून त्यांची पूजा केली जाते. रात्री 12 वाजता गावातून पालखी निघते. यामध्ये खार आंबोलीच्या वीर बजरंग व्यायामशाळेचे व्यायामपटू दांडपट्टा, मल्लखांब, लाठी, काठी असे शारीरिक कसरतीचे प्रयोग सादर करतात. या यात्रा उत्सवात स्थानिकांंसह बाहेरील नागरिकांना चांगला रोजगार उपलब्ध होत असुन यामध्ये हाजारो रुपायांची उलाढाल होत असते.