बोगस डॉक्टर ठरवून कारवाईची धमकी

बोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक जाळ्यात

|श्रीवर्धन | प्रतिनिधी|

बोगस डॉक्टर ठरवून रेड मारण्याची धमकी देत तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. घनश्याम बेलाजी कोमटवार (22), वर्ग-3 असे लाचखोर लोकसेवकाचे नाव असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.आरोपी घनश्याम कोमटवार याने तक्रारदाराला “तुम्ही बोगस डॉक्टर आहात, तुमच्यावर कारवाई करेन” अशी धमकी देऊन दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड युनिटकडे तक्रार नोंदवली होती.सोमवारी (दि.3) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तडजोडीअंती आरोपीने पाच हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.आरोग्य केंद्रात गर्दी असल्याने त्याने तक्रारदाराला बाहेर बोलावून घेतले. त्यानंतर दुपारी 3:55 ते 4 :15 वाजण्याच्या सुमारास, प्राथमिक आरोग्य केंद्र, बोर्ली पंचतन बाहेरील रस्त्यावर तक्रारदाराकडून 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीच्या हातावर व जीन्स पॅन्टच्या खिशाला ‘अँथ्रासिन पावडर’ मिळून आली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कारवाई करणारे पथक
ही यशस्वीकारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे व सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, रायगड युनिटच्या पोलीस उपअधीक्षक सरिता आय. एस. भोसले आणि त्यांच्या पथकातील पोसई अरुण करकरे, पोलीस हवालदार महेश पाटील व नवदित नांदगावकर यांनी केली.
ACB कडून नागरिकांना आवाहन
कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी काम करण्यासाठी लाच मागत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल-फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Exit mobile version