हाजीअली दर्ग्यावर अतिरेकी हल्ल्याची धमकी

। मुंबई । प्रतिनिधी ।
शहरातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये हा धमकीचा फोन आला होता. हा फोन उल्हासनगरमधून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फोनवरील व्यक्तीने, मुंबईत 17 दहशतवादी येणार असल्याचे सांगितले. हे दहशतवादी हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा दावा फोनवरील व्यक्तीने केला.

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आलेल्या या फोननंतर प्रशासन आणि सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या फोननंतर पोलिसांनी हाजी अली दर्ग्याच्या आजूबाजूचा परिसर, एल अँड टीच्या प्रोजेक्ट साइट हा सर्व भाग पिंजून काढला. मात्र, पोलिसांनी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.

ज्या नंबरवरून फोन आला होता. त्या नंबरवर पुन्हा फोन केला असता तो बंद असल्याचे आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबधित फोन हा उल्हासनगरहून आला असल्याचे तपासात समोर आले असून पोलिस फोन करणार्‍या इसमाचा शोध घेत आहेत. धमकीचा फोन काल (3 नोव्हेंबर 2022) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आला होता. तेव्हापासून पोलिसांचा तपास सुरु आहे. धमकी देणार्‍या व्यक्तीविषयी अद्याप पोलिसांच्या हाती कोणतीही ठोस माहिती लागलेली नाही.

Exit mobile version