| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
खारघर येथील विबग्योर शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्याने शुक्रवारी (दि.23) शाळा परिसरात खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा रिकामी करण्यात आली असून, नवी मुंबई पोलीस, खारघर पोलीस आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालेे. त्यानंतर शाळेच्या परिसरात तपासणी आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी खारघर येथील विबग्योर शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे शाळा प्रशासनाला मिळाली. त्यानंतर शाळेत एकच खळबळ उडाली. त्यानंतर नवी मुंबई पोलीस, खारघर पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. विद्यार्थ्यांच्या आणि शाळेतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शाळा रिकामी करण्यात आली. त्यानंतर बॉम्बशोधक पथकाकडून परिसराची तपासणी करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, ही धमकी अफवा असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, कोणताही धोका टाळण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असले, तरी त्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी
