जेवणाचे बिल भरण्यासाठी धमकी

तिघांवर नागोठणे पोलिसात गुन्हा दाखल

| नागोठणे | प्रतिनिधी |

येथील रिलायन्स कंपनीच्या मोकळ्या जागेत हायड्रॉलिक एक्सेल मशीन असलेला ट्रक एवढे दिवस इथे उभा का ठेवलास असे बोलून ट्रक चालक असलेल्या तक्रारदाराच्या गालावर चापट मारून व पायावर लाथेने मारहाण केली. तसेच ट्रक चालकाकडे आधी पाच हजारांची मागणी करून नंतर रोख पैसे नाहीत म्हणून चिकणी येथील हॉटेल गुलमोहर येथे गुगल पेद्वारे तीन हजार रुपयांचे जेवणाचे बिल जबरदस्ती भरण्यास लावणाऱ्या तिघांवर नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 8 ते 9 जूनदरम्यान घडली आहे.

यासंदर्भात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, नागोठण्याजवळील कुहिरे येथे असलेल्या रिलायन्स कंपनीच्या मोकळ्या जागेत श्रीकांत ओंकारनाथ पांडे, (42), रा. इंदापूर, जि. वाराणसी, सध्या रा. कळंबोली, नवी मुंबई या चालकाने हायड्रॉलिक एक्सेल मशीन असलेला ट्रक उभा करून ठेवला होता. त्यावेळी झोतिरपाडा (ता. पेण) येथील दोन व कुर्डूस (ता. अलिबाग) येथील एक अशा तिघांनी मिळून ट्रक चालकाला इथे ट्रक एवढ्या दिवस का उभा करून ठेवलास असे बोलून दमदाटी करून, त्याला मारहाण करून पाच हजारांची मागणी केली. त्यावेळी आपल्याकडे रोख पैसे नाहीत, अकाऊंटला आहेत, असे ट्रक चालकाने सांगितले. त्यामुळे आरोपींनी ट्रक चालकाला त्यांच्याकडे असलेल्या मोटारसायकलवर बसवून चिकणी येथील गुलमोहर हॉटेलला नेले. तेथे या तिन्ही आरोपींनी जेवण करून त्यांचे खाण्या-पिण्याचे बिल रुपये तीन हजार जबरदस्तीने ट्रक चालकाला गुगल पेद्वारे भरण्यास सांगितले. तसेच सदर बाब कोणाला सांगितली तर जीवे ठार मारण्यात येईल, अशी धमकीही दिल्याने तिन्ही आरोपींना नागोठणे पोलिसांनी 21 जून रोजी रात्री दोन वाजता अटक केली. आरोपींना पेण येथील फौजदारी न्यायालयाने 23 जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जी.डी. पावरा हे करीत आहेत.

Exit mobile version