दोघांना अटक
खोपोली | प्रतिनिधी |
शासनाची बंदी असतानादेखील गोवंश जातीचे मांसाची वाहतूक करणारा टेम्पो खालापूर पोलिसांनी पकडला असून, सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे साडेतीन टन मांस आणि सात लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो जप्त करण्यात आला असून, या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
अहमदनगर वरून आयशर टेम्पोतून गोवंश जातीचे मांस वाहतूक करण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कलोते गावाच्या हद्दीत रिंकी पॅलेस हॉटेलजवळ टेम्पो अडवला. टेम्पोची तपासणी केली असता, टेम्पोमध्ये कत्तल केलेले गोवंश जातीच्या जनावराचे मांस आढळून आले. याप्रकरणी टेम्पो चालक जहीर इस्माईल कुरेशी (42, रा. ठाणे) आणि गणी कुरेशी (रा. कुर्ला) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. साडेतीन लाख किमतीचे गोवंश जातीच्या जनावरांचे मास आणि सात लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण साडेदहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.