। पालघर । प्रतिनिधी ।
वाडा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. नेहरोली गावातील एका बंद घरात एकाच कुटुंबातील तीन जणांचे मृतदेह आढळले आहेत. मात्र, हि आत्महत्या आहे कि हत्या आहे अद्याप समझू शकले नाही.
वाडा तालुक्यातील नेहरोली या गावात मुकुंद बेचलदास राठोड (70) हे 25 वर्षांपासून पत्नी कांचन मुकुंद राठोड (69) आणि मुलगी संगीता मुकुंद राठोड (51) यांच्यासह राहत होते. त्यांनी स्वतः जागा घेऊन एक इमारत बांधली होती. इमारतीत भाडेकरूंसह स्वतःही एका खोलीत राहत होते. त्यांचा मुलगा सुहास कामानिमित्त बाहेरगावी राहतो. गेल्या दहा दिवसांपासून त्याचा कुटुंबियांसोबत संपर्क झाला नव्हता. म्हणून सुहास हा शुक्रवारी (दि.30) दुपारी नेहरोली येथे आला. मात्र, घराला बाहेरून कुलूप असल्याने कुटुंब आजारी तर नाही ना या चिंतेने सुहास यांनी आजूबाजूचे सर्व दवाखाने तपासले. शेजारीही चौकशी केली असता काही माहिती मिळाली नाही. शेवटी घराचे कुलूप तोडून तो घरात गेला. तेव्हा त्याला दुर्गंधीचा वास आला. पुढे गेल्यानंतर बाथरूमच्या दरवाज्यात वडिलांचा मृतदेह आढळला.
त्याने वाडा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला असता घरात पत्र्याच्या पेटीमध्ये आई आणि मुलीचा मृतदेहही आढळला. ही घटना होऊन बरेच दिवस झाल्याने प्रेताला दुर्गंधी सुटली होती. या घटनेचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.