आईने दोन चिमुरड्यांसह इमारतीवरुन उडी घेत संपवलं जीवन
| रसायनी | प्रतिनिधी |
पैशांच्या मागणीसाठी वारंवार फोन, जीवे मारण्याच्या धमक्या आणि घरात घुसून कुटुंबियांचा मानसिक छळ केल्याच्या आरोपातून रसायनीत मन सुन्न करणारी घटना घडली आहे. कथित छळाला कंटाळून एका 30 वर्षीय आईने आपल्या 11 वर्षांच्या मुलासह अवघ्या सहा वर्षांच्या मुलीला घेऊन इमारतीच्या डक्टमधून उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना भोकरपाडा येथील हिरानंदानी फॉर्च्युन सिटी परिसरात घडली. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून, याप्रकरणी पुण्यातील विश्वनाथ देसाई आणि अक्षरा विश्वनाथ देसाई या बाप-लेकीविरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मच्छिंद्र नारायण पोपेटा हे आपल्या कुटुंबासह हिरानंदानी फॉर्च्युन सिटीमधील मिनर्वा सोसायटीत वास्तव्यास होते. आरोपींकडून त्यांच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधून पैशांची मागणी केली जात होती. तसेच फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या देत मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्वाधिक धक्कादायक घटना सोमवारी (दि.2 ) रात्री सुमारे 8.45 वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपी फिर्यादीच्या घरी आले. त्यांनी घराच्या मुख्य दरवाजावर लाथा मारून दरवाजा उघडण्यास भाग पाडले आणि घरात प्रवेश केला. त्यानंतर फिर्यादीची पत्नी व मुलांना धमकावून मानसिक त्रास दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर फिर्यादीची पत्नी मानसी मच्छिंद्र पोपेटा (30), मुलगा रुद्र (11) आणि मुलगी हंसिका (6) यांनी फ्लॅटच्या डक्टमधून खाली उडी मारली. या दुर्दैवी घटनेत तिघांचाही मृत्यू झाला. आईसह दोन लहान मुलांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशांच्या वादातून झालेला कथित छळ आणि त्यानंतर घडलेली ही भीषण घटना यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. तसेच ई-साक्ष ॲपच्या माध्यमातून पंचनामा करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव पुढील तपास करीत आहेत. पैशांच्या वादातून सुरू झालेला कथित छळ, कुटुंबाला दिलेल्या धमक्या आणि घटनेच्या दिवशी घडलेला प्रकार यांची सखोल चौकशी आता पोलिसांकडून केली जात आहे. या तिहेरी मृत्यूमागील नेमकी कारणे आणि आरोपींची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे.
