मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश
। पालघर । प्रतिनिधी ।
बोईसरमध्ये खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार पैकी तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर एका मुलाला वाचवण्यात यश आले आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 27) दुपारच्या सुमारास घडली असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गणेश नगर परिसरातील झोपडपट्टीत राहणारी चार शाळकरी मुले दुपारच्या सुमारास घराच्या पाठीमागील असलेल्या मोकळ्या जागेतील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पोहताना यापैकी तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. एका मुलाला पाण्याबाहेर निघण्यास यश मिळाले. या घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस आणि तारापूर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्यातून तीन मुलांचे मृतदेह बाहेर काढून वैद्यकीय तपासणीसाठी बोईसर ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. तसेच, मृतांमध्ये एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा समावेश असून या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
