| चिपळूण | प्रतिनिधी |
जूनसह पुढील दोन महिन्यांचे धान्य शिधापत्रिकाधारकांना एकदाच मिळणार आहे. मात्र, जागेअभावी एवढ्या धान्याचा साठा दुकानात कसा करावा, असा प्रश्न रास्त धान्य दुकानदारांना पडला आहे. त्यामुळे शासनाने जून महिन्यात दुकानदारांना 3 टप्प्यात धान्य पुरवठा करावा व तिन्ही महिन्यांची धान्य विक्री ऑनलाईन पध्दतीने करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक, मालक संघटनेने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, जून महिन्यात जुलै व ऑगस्ट महिन्याचे धान्य एकदाच वितरित करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा विभागाकडून संघटना व जिल्ह्यातील रास्त धान्य दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. मात्र, आमची दुकाने पाहता इतके धान्य ऐन पावसाळ्यात ठेवायचे कुठे, असा प्रश्न आम्हांला पडला आहे. त्यामुळे त्याचा विचार करून हे धान्य दुकानदारांना जून महिन्यात 3 टप्प्यात दिल्यास त्याचे त्याच महिन्यात शिधापत्रिकाधारकांना वितरण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे धान्य खराब होण्याची भीती राहणार नाही. तसेच, 3 महिन्याचे धान्य वितरित करायचे आहे, इतकेच सांगण्यात आले असून ते ऑनलाईन पद्धतीने वितरित न केल्यास दुकानदारांना त्याच्या कष्टाचे कमिशन मिळणे कठीण होणार आहे. त्यामुळे तिन्ही महिन्याचे धान्य ऑनलाईन पध्दतीने देण्याची परवानगी देणे गरजेचे आहे. तसेच, गेल्या 5 महिन्यांपासून दुकानदारांना विक्री कमिशन मिळालेले नाही, ते तातडीने देण्याची मागणीही करण्यात आली आहे. हे निवेदन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अशोक कदम, खजिनदार रमेश राणे आदींनी दिले आहे.