वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या क्रुझरचा अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू

सहा जण गंभीर जखमी

। जळगाव । प्रतिनिधी ।

जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराड खुर्द जवळ महामार्गावर लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या क्रुझर गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात नुकतेच लग्न झालेल्या नववधूसह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (दि.29) सकाळी झाला असून या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे वऱ्हाड गुजरातमधील वापी येथून अकोल्याच्या दिशेनं जात होते. धरणगाव तालुक्यातील वराड जवळ क्रुझर वाहनाचे पुढचे चाक अचानक निखळले. वाहन वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही क्रुझर समोरील ट्रकला जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून गाडीतील नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले.

पूजा रवी वाघळकर (22) असे मृत नववधूचे नाव आहे. तर दत्तू भागवत आणि जगदीश वाघळकर यांचाही या अपघातात मृत्यू झाला. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले असून, त्यात एका लहान बालकाचा देखील समावेश आहे. या बालकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना तातडीने जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तर विवाह समारंभाच्या काही तासांतच नववधूचा मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Exit mobile version