| नवीन पनवेल | प्रतिनिधी।
चंदेरी किल्ल्यावर वाट चुकलेल्या तिघांची सह्याद्री प्रतिष्ठान पनवेल दुर्गसेवक, पोलीस पाटील आणि पनवेल तालुका पोलिसांच्या मदतीने सुखरूप सुटका करून त्यांना खाली आणण्यात आले.
रविवारी (दि.23) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास चंदेरी किल्ला येथे काही तरुण अडकले असून, त्यांना पोलीस मदत हवी असल्याचा कॉल पनवेल तालुका पोलिसांना प्राप्त झाला. यावेळी वावंजे पोलीस चौकी ते चंदेरी किल्ला तामसई हे अंतर जवळपास 16 ते 17 किलोमीटर होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आनंदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमर भालसिंग आणि पोलीस नाईक मिलिंद जाधव, रिटघर गावचे पोलीस पाटील दीपक पाटील यांच्या मदतीने तामसई गाव येथे आले. सह्याद्री प्रतिष्ठान पनवेल दुर्गसेवक गौरव दरवडा, मयूर टकले, आदेश पाडेकर यांच्या मदतीने चंदेरी किल्ला डोंगर चढून डोंगरात अडकलेले ओम खिल्लारी, पार्थ कडवे, ऋषील भार्गव वृंदावन (कामोठे) यांना सुस्थितीत खाली आणण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते सकाळी आठ वाजता पनवेल येथून ट्रेकिंगसाठी आले होते. मात्र, डोंगरामध्ये रस्ता चुकल्याने त्यांना खाली आणि वर देखील जाता येत नव्हते. त्यांनी 112 वर कॉल केल्यानंतर सह्याद्री प्रतिष्ठान पनवेल दुर्गसेवक, पोलीस पाटील आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना दुपारी चारच्या सुमारास सुखरूपपणे खाली आणण्यात आले.
चंदेरी किल्ल्यावर अडकलेल्या तिघांची सुखरूप सुटका
