। मुंबई। प्रतिनिधी ।
भाईंदरच्या राई गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. राज्यात अगोदरच मराठी विरुद्ध अमराठी असा वाद सुरु आहे. असे असताना देखील अनेक ठिकाणी परप्रांतीयांकडून दादागिरी व मारहाण करण्याचे प्रकार समोर आले आहे. अशातच भाईंदरच्या राई गावामध्ये परप्रांतीयांकडून स्थानिक भूमीपुत्रावर तलवारीने प्राणघातक हल्ला करून बेदम मारहाण करण्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहेत. यातून रुपेश पाटील, भूषण पाटील, नितेश पाटील या स्थानिक असलेल्या तरुणांवर काही परप्रांतीयांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. मारहाणीत दोन तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान घटनेतील मारहाण करणारे दोन आरोपी काशिमीरा पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. तर उर्वरित आरोपी फरार आहेत. या आरोपीना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केली आहे. अन्यथा पुन्हा मराठी माणूस रस्त्यावर उतरून परप्रांतीयांच्या विरोधात आंदोलन करेल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.







