पोलीस पाटलाला मारहाणप्रकरणी तिघांना कारावास

। माणगाव । प्रतिनिधी ।

रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटील पांडुरंग दिवकर यांना सरकारी कामकाज बजावत असताना मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी न्यायालयाने तीन आरोपींना दोन वर्षे साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच प्रत्येक आरोपीस तीन हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

या प्रकरणात फिर्यादी पांडुरंग दिवकर यांनी आरोपी विनोद कासकर याच्याविरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची समज देण्यासाठी दिवकर हे आरोपीच्या घरी गेले असता, त्यांना हाताबुक्क्यांनी मारहाण तसेच शिवीगाळ करण्यात आली. या तक्रारीवरून रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. एस. रोडे यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केला. सुनावणीदरम्यान फिर्यादी पोलीस पाटील पांडुरंग दिवकर, पंच आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. सादर झालेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी विनोद कासकर, दिपेश न्हावकर आणि दिपक न्हावकर यांना दोषी ठरवत दोन वर्षे साध्या कारावासाची व प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Exit mobile version