महाजने बौद्धवाडी प्रीमियर लीग 2025
। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाजने बौद्ध ग्रामस्थ मंडळ, भीमतेज युवा व महिला मंडळ यांच्यावतीने ‘गावासाठी व समाजासाठी एक दिवस’ हा उपक्रम हाती घेत महाजने बौद्धवाडी प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील तरुण मंडळींनी एकत्र येत राबविलेल्या या उपक्रमाचे हे दुसरे पर्व असून मर्यादीत षटकांची ओव्हरआर्म स्पर्धा रविवारी (दि.12) अलिबाग तालुक्यातील महाजने येथील मैदानावर पार पडली. या स्पर्धेत थ्री स्टार वॉरिअर्स, संदीप इलेव्हन, सम्राट इलेव्हन आणि हाशा वॉरिअर्स या संघानी सहभाग घेतला होता. त्यात थ्री स्टार वॉरियर्स संघ अंतिम विजेता ठरला आहे.
या स्पर्धेतील उद्घाटनीय सामना हाशा वॉरिअर्स आणि थ्री स्टार वॉरिअर्स या संघात झाला. थ्री स्टार वॉरिअर संघातील कर्णधार समीर जाधव, सुशांत जाधव व अमर जाधव यांनी जोरदार फटकेबाजी करीत चार षटकांत 48 धावा केल्या होत्या. हाशा वॉरिअर्स संघातील कर्णधार शुभम जाधव आणि वैभव जाधव यांनी हे आव्हान स्विकारत दोन षटकात 49 धावा करून हाशा वॉरिअर्स संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर, थ्री स्टार वॉरिअर्स आणि सम्राट इलेव्हन या संघामध्ये अंतिम सामना झाला. सुरूवातीला सम्राट इलेव्हन संघाने फलंदाजी केली. या संघाने चार षटकात 36 धावा केल्या. थ्री स्टरी वॉरिअर संघाला विजयासाठी 37 धावांची आवश्यकता होती. 24 चेंडूमध्ये 37 धावांचे लक्ष पुर्ण करण्यासाठी थ्री स्टार वॉरिअर संघातील अमर जाधव, सुशांत जाधव यांनी शर्तीचे प्रयत्न केले. कधी एक ते दोन धावा, तर कधी षटकार व चौका मारत संघाला विजयाच्या दिशेने नेले. अखेर थ्री स्टार वॉरिअर संघ अंतिम विजेता ठरला. या संघातील फलंदाजासह गोलदांज, यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षकांची कामगिरीदेखील महत्वपूर्ण राहिली.
या स्पर्धेत थ्री स्टार वॉरिअर्स संघाला प्रथम आणि सम्राट इलेव्हन संघाला द्वितीय क्रमांकाचे चषक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी, नितेश कांबळे व वृषाली कांबळे यांच्या हस्ते विजेत्या संघाला चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, अमर जाधव यांना उत्कृष्ट फलंदाज व सामनावीर, सम्राट इलेव्हन संघातील अक्षय जाधव यांना उत्कृष्ट गोलंदाज आणि हाशा वॉरिअर्स संघातील मानस जाधव यांना उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून पदक व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच, खेळामध्ये चांगली कामगिरी बजावल्याने वेगवेगळ्या खेळाडूंचादेखील पदक देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी, मॅकेनिकल इंजिनिअर नितेश कांबळे, वृषाली कांबळे, सदानंद दुधाळे, राम जाधव, नंदकुमार जाधव, आदी मान्यवरांसह संघ मालक शिवाजी जाधव, किसन जाधव, संजय गायकवाड, प्रकाश जाधव, शत्रुग्न जाधव, खेळाडू, महिला वर्ग, क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांनी जपली बांधिलकी
ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी एमबीपीएल स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांकाचे चषक नितेश कांबळे यांनी त्यांच्या वडीलांच्या स्मरणार्थ दिले होते. तसेच, क्रिकेट खेळाबद्दल अस्था असणारा तरुण अनिकेत पवार यांनी उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज व सामनावीर चषक देऊन बांधिलकी जपली.