मुख्यमंत्री ग्रामसडक रस्त्याचे तीनतेरा

पाच वर्षांची हमी असताना एकदाही दुरुस्ती नाही

| तळा | वार्ताहर |

रहाटाड, सोनसडे, वरळ, गणेश नगर या गावांना जोडणारे रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून काही वर्षांपूर्वी झाले. मात्र, ठेकेदाराने या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हे रस्ते पूर्ण होत असताना ठेकेदाराने पाच वर्षे देखभालीची हमी घेतलेली असेल; परंतु ही हमी कुठे गायब झाली, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात असून, ठेकेदार व प्रशासन यांच्या मिलीभगत कारभारावर लोकप्रतिनिधींचा वचक आहे की नाही, असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.

राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी रस्त्यांना मोठा निधी दिला जातो. ग्रामीण भागातील रस्ते मजबूत झाले पाहिजे, असा या योजनेचा उद्देश आहे. मात्र, रस्त्याचे काम सुरू असताना अधिकारी व ठेकेदार यांच्या संयुक्त कारभारामुळे रस्त्यांची कामे निकृष्ट होतात हेदेखील तितकेच सत्य. त्यामुळे ठेकेदारांवर नियंत्रण ठेवत नसल्याने ठेकेदार रस्त्यांचे थातूरमातूर काम करून परागंदा होतात. मात्र, त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला सोसावा लागतो. यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकारीवर्गाने मुदत न संपलेल्या रस्त्यांची पाहणी करून त्वरित रस्ते दुरुस्ती करावी, अशी मागणी तळा तालुक्यातून होत आहे. लोकप्रतिनिधींनीदेखील याकडे लक्ष देत संबंधित विभागाला आदेश देऊन त्वरित दुरुस्ती व्हावी, अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधान ग्रामसडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार झालेल्या रस्त्यांची संबंधित ठेकेदारांकडून पाच वर्षांसाठी हमी घेतली जाते. पाच वर्षांत रस्त्याची दुरुस्ती तसेच डागडुजीची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदारांची असते. या रस्त्याच्या देखरेखीसाठी संबंधित विभागाकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूकदेखील केली आहे. परंतु, रस्त्याची एवढी चाळण होऊन सर्वसामान्य जनता त्रस्त होत असताना संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष जात नाही का की ठेकेदाराला आर्थिक भुर्दंड नको म्हणून संबंधित अधिकारी हेतूपुरस्सर दुर्लक्ष करतात, हा संशोधनाचा विषय आहे.

Exit mobile version