| पनवेल | वार्ताहर |
तळोजा कारागृहाशेजारील डोंगरावर वरळी येथून ट्रेकिंगसाठी आलेले तिघेजण रस्ता चुकल्यामुळे खोल दरीत अडकले होते. या पर्यटकांना पोलीस, अग्निशमन जवान आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाचविण्यात यश आले आहे.
वरळी दादर येथील संजय धवल हा त्यांच्या दोन सहकार्यांसह तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्या मागे असलेल्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले होते. ट्रेकिंग करताना वाढलेले गवत आणि झाडाझुडुपांमुळे तिघेही भरकटले. बाहेर पडण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले. मात्र, बर्याच प्रयत्नानंतरही कसोशीनेही यश मिळाले नसल्याने नातेवाइकांना संपर्क साधला होता. यावेळी खारघर परिसरातील पर्यटकांनी नवी मुंबई पोलिसांशी हेल्पलाईनद्वारे संपर्क करत पर्यटकांची माहिती दिली होती. सेक्टर 35 मध्ये वास्तव्यास असलेल्या पर्यावरणप्रेमी ज्योती नाडकर्णी यांनी सहकार्यांच्या मदतीने डोंगरावर रोपांची लागवड केली आहे. नाडकर्णी यांना याबाबतची माहिती मिळताच झाडांची देखभाल करणार्या कामगारांना त्यांनी माहिती दिली. झाडांच्या सभोवताली लावलेल्या नेटचा आधार घेत कामगारांनी तिघांना बाहेर काढले. यावेळी खारघर अग्निशमन केंद्राचे जवानांसह पोलीसदेखील उपस्थित होते.