ठाण्यात तीन वाहनांचा अपघात; एकाचा मृत्यू

। ठाणे । प्रतिनिधी ।

ठाण्यात तीन वाहनांचा एकमेकांना धडकून अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

ठाण्यातील ज्युपीटर हॉस्पिटल परिसरात हा अपघात झाला आहे. एका डंपरचे चाक पंक्चर झाल्याने डंपरचालकाने वाहन रस्त्यातच उभे केले होते. पहाटेची वेळ असल्याने मागून येणाऱ्या टेम्पोचालकाला अंदाज न आल्याने टेम्पो उभ्या असलेल्या डंपरला धडकला. त्याचवेळी मागून येणारी आणखी एक दुचाकी या टेम्पोला जोरदार धडकली. या अपघातात दुचाकीचालक वैभव डावखर (27) याचा मृत्यू झाला. तर अन्य दोन जण या अपघातामध्ये जखमी झाले आहेत.

या अपघातामधील जखमी व्यक्तींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र पुन्हा वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.

Exit mobile version