15 महिला गंभीर जखमी
। बीड । प्रतिनिधी ।
बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगावजवळ कांदा काढणीसाठी मजूर घेऊन निघालेल्या पिकअपचे टायर फुटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 15 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. कामगार दिनादिवशीच ही दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
बीडच्या वंजारवाडी येथील 18 ते 20 महिला पिकअपमधून कांदा वेचणीसाठी जात होत्या. त्यांच्यासोबत त्यांची मुलेदेखील होती. दरम्यान, अहिल्यानगर महामार्गावर धामणगाव येथे या पिकअपचा टायर अचानक फुटला आणि चालकाचे नियंत्रण सुटले ज्यामुळे पिकअप उलटला. अपघात एवढा भीषण होता की, तीन महिला जागीच ठार झाल्या आहेत. तर इतर 15 महिला गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवले आहे. अपघाताचे नेमके कारण काय यासाठी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. चौकशीतून पिकअपचा टायर फुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अपघात पिकअप वाहनाचा चक्काचूर झाला आहे. कामगार दिनाच्या दिवशीच ही दुर्घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.






