। दापोली । प्रतिनिधी ।
दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे संक्रांतीच्या दिवशी तीन वयोवृद्ध महिलांचा मृत्यू हा जळून झालेला नसून त्यांचा दागिन्यांच्या हव्यासापोटी अज्ञाताने त्यांचा खून केल्याचे आता पोलीस तपासात पुढे आले आहे. या घटनेमुळे दापोली तालुका पुन्हा एकदा हादरला आहे. तर तालुक्यातील वयोवृद्ध नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दापोली पोलिसांनी याबाबत चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. तीन महिलांच्या अंगावरील 1 लाख 62 हजार 150 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेल्याचे पोलीस स्थानकात नोंद झालेल्या गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये सत्यवती पाटणे, पार्वती पाटणे व रुक्मिणी पाटणे यांच्या डोक्यात प्रहार करून नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शशीकिरण काशीद हे करत आहेत.