आधी अत्याचार मग वार; तीन वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या

सुटकेसमध्ये आढळला मृतदेह; अल्पवयीन तरुणाला अटक

। पुणे । प्रतिनिधी ।

भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये घडलेल्या अल्पवयीन चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला असताना आता पुण्यातील चाकणमधून आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. चाकणच्या म्हाळुंगे दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वर्षाच्या चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार करुन त्याची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा बिहार राज्यातील असलेल्या एका सोळा वर्षे अल्पवयीन तरुणानी हे कृत्य केले आहे. दक्षिण महाळुंगे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे. मृत चिमुकल्याचे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशमधील असून काम निमित्तानं चाकणमधील खालुंब्रे परिसरात वास्तव्यास होते. शुक्रवारी त्यांचा तीन वर्षीय मुलगा हा शेजारी राहणाऱ्या खेळण्यासाठी मुलीला बोलावण्यासाठी गेला होता. मात्र, तो बराच वेळ घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी आजूबाजूला शोधाशोध सुरू केली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी या परिसरातील खोल्यांची तपासणी केली. त्यातील एक खोली बंद आढळली. पोलिसांनी दरवाजा तोडून या खोलीची तपासणी केली असता सुटकेसमध्ये मुलाचा मृतदेह आढळून आला. आरोपीने मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून चाकूने गळा चिरून त्याचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

खून केल्यानंतर खोली बंद करून आरोपी तेथून पसार झाला होता. तो बिहारला जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्याला पुणे रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले आहे. आरोपी महिन्याभरापूर्वी एकटाच मजुरीसाठी चाकणमध्ये आला होता. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

भोर तालुक्यातील नरसापूरमध्ये चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करुन तिला संपवल्याची घटना ताजी असतानाच लगेच पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये तीन वर्षाच्या चिमुकल्यावर अत्याचार करुन त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

Exit mobile version