बसचालक गजाआड
। कळंबोली । प्रतिनिधी ।
कामोठे येथे शाळेतून घरी परतणाऱ्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर खासगी स्कूल बसच्या चालकाने बसमध्येच लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नवी मुंबई आणि पनवेल परिसरात पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून शालेय वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बसचालक इस्का आरगुम यादव (वय-30, रा. सेक्टर-3, कळंबोली) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकली ही कामोठे सेक्टर 36 येथील एका नामांकित शाळेत बालवाडीत (Kindergarten) शिकते. ती दररोज शाळेच्या खाजगी बसने ये-जा करत असे. बुधवारी (दि.2) दुपारी 12.30 ते 3च्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ती नेहमीप्रमाणे घरी जाण्यासाठी स्कूल बसमध्ये बसली. बसचालकाने मार्गावरील इतर सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित थांब्यावर उतरवले. मात्र, सर्वात शेवटी ही तीन वर्षांची चिमुकली बसमध्ये एकटीच राहिली. बसमध्ये इतर कोणीही नसल्याचा आणि चिमुकली एकटी असल्याचा गैरफायदा घेत नराधम चालक यादव याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
चिमुकली जेव्हा घरी पोहोचली, तेव्हा तिने पोटात तीव्र दुखत असल्याची तक्रार केली आणि ती रडू लागली. कुटुंबियांनी आणि विशेषतः तिच्या आजीने तिला विश्वासात घेऊन प्रेमाने विचारपूस केली. त्यावर चिमुकलीने ‘बसच्या ड्रायव्हर काकांनी त्रास दिला’ असे सांगितले. चिमुकलीचे हे शब्द ऐकून कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती संबंधित शाळा प्रशासनाला दिली आणि रात्री उशिरा कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
घटनेचे गांभीर्य ओळखून कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख यांनी तात्काळ पथके रवाना केली. पोलिसांनी पीडित बालिकेची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची पुष्टी झाली. पोलिसांनी आरोपी चालक यादव विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला गुरुवारी (दि.3) अटक केली. आरोपी बसचालकाला पनवेल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला शनिवार, 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या खाजगी बसमध्ये नियमानुसार महिला अटेंडंट (मदतनीस) किंवा केअरटेकर का नव्हती? शाळा व्यवस्थापनाने बसचालकाची योग्य पडताळणी केली होती का? याबाबत कामोठे पोलीस शाळा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून घेत असून पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे करत आहेत.
