पाचगणीत रंगणार राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार

। पाचगणी । प्रतिनिधी ।
पाचगणी व्यायाम मंडळाच्या विद्यमाने दि. 4 ते 7 जानेवारी या कालावधीत राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष व स्थानिक महिला गटाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. व सातारा जिल्हा कबड्डी असो.च्या मान्यतेने घेण्यात आलेली आहे. याकरिता पाचगणीच्या भाऊसाहेब भिलारे क्रीडानगरीत 3 क्रीडांगणे तयार करण्यात आली आहेत. महिंद्रा, भारत पेट्रोलियम, महाराष्ट्र पोलीस, पुणे पोलीस, युनियन बँक, जी.एस.टी.पुणे, आयकर – पुणे, मुंबई महानगर पालिका, मध्य रेल्वे, मध्य रेल्वे डिव्हिजन, बँक ऑफ बडोदा, रिझर्व्ह बँक, सेंट्रल बँक, जे. जे. रुग्णालय व हिंदुजा रुग्णालय असे 16 व्यावसायिक संघ सहभागी होणार आहेत. महिला गटात शिवशक्ती, डॉ.शिरोडकर, स्वामी समर्थ, जिजामाता, गोलफादेवी, महात्मा गांधी, स्वराज्य, राजमाता जिजाऊ, जागृती, छत्रपती शिवाजी, हनुमान मंडळ-कोल्हापूर, शिवाजी उदय-सातारा असे 12 संघ सहभागी होणार आहेत. चार दिवस चालणारे हे सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येतील. कोरोनामुळे 2 वर्ष या स्पर्धेत खंड पडला होता. दोन वर्षांनंतर हे सर्व संघ बाळासाहेब भिलारे चषकावर आपले नाव कोरण्यासाठी एकमेकांना भिडतील.

Exit mobile version