बेथ एल प्रार्थनालयात सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम
| पनवेल | प्रतिनिधी |
शहरातील टपाल नाका येथील बेथ एल प्रार्थनालयात सशस्त्र अतिरेकी घुसल्याचा संदेश मिळताच पनवेल पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा तातडीने ॲक्शन मोडमध्ये आली. कमांडो आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरू असल्याचे चित्र निर्माण झाल्याने परिसरात काही काळ थराराचे वातावरण निर्माण झाले. मात्र, ही प्रत्यक्ष घटना नसून सुरक्षा यंत्रणांकडून घेण्यात आलेली नियोजित मॉक ड्रिल असल्याचे स्पष्ट झाले.
अतिरेकी घुसल्याची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराचा ताबा घेतला. संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या वेळी कोणत्या पद्धतीने कारवाई करावी, नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर कसे काढावे आणि संशयितांचा सामना कसा करावा, याचे प्रात्यक्षिक या रंगीत तालीमीत घेण्यात आले. या मॉक ड्रिलमध्ये पनवेल विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, क्यूआरटी पथक, बीडीडीएस आणि श्वान पथक सहभागी झाले होते. कमांडो पथकाने प्रार्थनालयाच्या परिसरात प्रवेश करून अतिरेक्यांचा सामना करण्याची कारवाई केली. आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य आणि विविध यंत्रणांमधील समन्वय तपासण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलीस, कमांडो पथक आणि अग्निशमन दलाने संयुक्तपणे परिस्थिती हाताळण्याचा सराव केला. मॉक ड्रिलदरम्यान निर्माण झालेल्या थरारक दृश्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ संभ्रम निर्माण झाला. मात्र, ही नियोजित सुरक्षा रंगीत तालीम असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. संभाव्य दहशतवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत विविध सुरक्षा व बचाव यंत्रणांची तत्परता आणि समन्वय तपासणे हा या मॉक ड्रिलचा मुख्य उद्देश होता.
