मेलबर्नचे तिकिट अ‍ॅडलेडमध्ये मिळणार

प्रत्येक सामना वेगळा असतो. आधीची प्रतिस्पर्ध्यांविरुद्धची कामगिरी त्यामुळे आकडेवारीपुरतेच महत्व ठेवते. क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. भारताच्या कर्णधार रोहित शर्माने नेमके हेच सत्य पुन्हा एकदा प्रसिद्धी माध्यमांसमोर सरावादरम्यान मांडले. इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमधील मालिकेतील निकालाला महत्व नाही. त्यावेळी खेळलेला काही खेळाडू या संघांतही नाहीत. त्यामुळे आकडेवारी व गत कामगिरीचा विचार केल्यास भारतासाठी आयसीसी टी-20 विश्‍वचषकावर अंतिम स्पर्धेचे द्वार उघडणारा अ‍ॅडलेड येथील इंग्लंडविरुद्धचा सामना नवी सुरुवात असेल.

इंग्लंडविरुद्ध लढतीच्या बाबतीत ही नवी सुरुवात असेल. मात्र शास्त्रीय संघासाठी समस्या आहेत. या समस्या कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीच्या फॉर्मपासून सुरु होत आहेत. के.एल.राहुल स्वत:च चाचपडत खेळत असल्याने दुसर्‍या टोकापासून मिळणारा प्रतिसाद रोहितला मिळत नाही. त्यामुळे पॉवरफ्लेमध्ये धावा वाढविण्याच्या प्रयत्नात तो खराब फटका खेळून आपली विकेट बहाल करत आहे. धावा वेगात काढायचे दडपण रोहितवर अधिक येत आहे. के.एल.राहुलने दोन अर्धशतके काढली असली तरीही तो सुरुवातीला वेगात खेळत नाही, हेही सत्य नाकारता येत नाही.

विराट कोहली व सुर्यकुमार यादव ही मधली फळी फॉर्मात आहे. मात्र त्यानंतरच्या क्रमांकासाठीचे भारताचे प्रयोग अजून तरी यशस्वी ठरले नाहीत. अष्टपैलू खेळाडूंची वानवा असल्याने भारताचा सलामी व मधल्या फळीवर दडपण येत आहे. सुर्यकुमार यादव सध्या फॉर्मात आहे. पण त्यानंतर आपल्याकडे मधल्या फळीत स्थिरावलेला अष्टपैलू खेळाडू नाही. हार्दिक पंड्याची पाकिस्तानविरुद्ध लढतीमधील एक खेळी समयोचित होती. अक्षर पटेल, हुज ॠषभ पंत आणि यष्टीरक्षक म्हणून काम करणारा दिनेश कार्तिक हे सर्वजण ‘कार्ड पंच’ करून पॅन्हेलियममध्ये परतले.

म्हणून इंग्लंडसारख्या प्रतिस्पर्धांचे कच्चे दुवे हेरण्यात वाकबगार संघासमोर पुन्हा एकदा भारताच्या मधल्या फळीची कसोटी लागणार आहे. तळाच्या फळीतील अश्‍विन टोलेबाजी करू शकतो. परंतु शामी, भुवनेश्‍वर आणि अर्षदीपसिंग यांचा फटकेबाजीसाठीचा लौकिकही फारसा चांगला नाही, त्यामुळे भारताचे शेपूट बरेच आधी सुरू होते.

इंग्लंड संघाने याचा अभ्यास केला आहे, असे त्यांचा कर्णधार बटलर पत्रकार परिषदेत म्हणत होता. आमच्यावर दडपण नाही. कारण सर्व लोक मेलबर्नमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होणार असे म्हणत आहेत. त्याचे दडपण भारतावर आहे. बटलरच्या मते येथील खेळपट्टी आधी वापरण्यात आलेली आहे. मैदान छोटे आहे. त्याचा लाभ घ्यायचा कारण ते आम्हाला ज्ञात आहे. मात्र भारतीय संघाला आम्ही जराही कमी लेखत नाही. अनुभवी खेळाडू व दर्जेदार नवोदित खेळांडूमुळे हा संघ कडवा प्रतिस्पर्धी आहे; असे बटलरने सांगितले.

रोहित शर्मा मात्र सुर्यकुमार यादवची मुक्तकंठाने स्तुती करीत होता. तो म्हणत होता, सुर्याला छोटे मैदान आवडत नाही. त्याला त्याचे मैदानाच्या सभोवताल फटके खेळायला आवडतात. जे त्याने नव्याने विकसीत केले आहेत. मैदान मोठे असले, क्षेत्र व्यूहामध्ये मोकळा जागा अधिक दिसल्या की त्याला खूप बरे वाटते. रोहितने ॠषभपंत की दिनेश कार्तिक या प्रश्‍नावर ठामपणे सांगण्यास नकार दिला. तो म्हणाला, पंतला दोन सराव सामने वगळता फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे झिम्बांबेविरुद्ध आजमावून पाहिले. मात्र आज परिस्थितीचे आकलन करूनच निर्णय घेतला जाईल. खेळपट्टीचे कोरडे स्वरूप आणि 29 डिग्री उष्णतामान लक्षात घेता भारतीय संघ अश्‍विनच्या जोडीला यजुवेंद्र चहलचा विचार करू शकतो.

इंग्लंड संघाने पाठीराखेही अ‍ॅडिलेडमध्ये मोठ्या संख्येत दाखल झाले आहेत. मात्र जेव्हा भारताचा सामना असतो तेव्हा संपूर्ण परिसर हिन्दुस्थानी होऊन जातो. तिरंगा घेऊन मोठ्या संख्येत येणारी भारतीय कुटुंब आणि परदेशातून आलेले क्रिकेट रसिक यामुळे भारताच्या मैदानात सामना सुरू होण्याआधीच स्टेडियमबाहेर रोमहर्षक आणि रोमांचक क्षणांचे साक्षीदार होता येईल.

Exit mobile version