खैर लाकडाची तस्करी करणारा ट्रक जप्त

। महाड । प्रतिनिधी ।
महाबळेश्‍वर पोलादपुर मार्गावरील कापडे येथे विना परवाना खैर सोलिव लाकडाची वाहतुक करणार्‍या ट्रकला वन विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करुन टेम्पो आणि खैराचे लाकुड असा एकुण 3 लाख 47 हजार 47 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. वन विभागाने केलेल्या कारवाईमुळे पुन्हा एकदा महाड आणि पोलादपुर तालुक्यांमध्ये लाकडाची तस्करी मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याचे उघडकीस आले.

याबाबत मिळालेल्या माहिती वरुन उप वनसंरक्षक रोहा यांच्या मार्गदर्शना खाली सदरची कारवाई करण्यात आली असुन वन विभागाला खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी संध्याकाळी टाटा 407 हा टेम्पो क्रमांक एमएच 04-इएल-2288 कापडे गावाजळ उभा असताना या टेम्पोची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यामध्ये विना परवाना खैर लाकूड असल्याचे आढळून आले. संपुर्ण चौकशी करण्यात आल्यानंतर टेम्पो आणि त्यामध्ये असलेला 2.916 घ.मी.लाकुड जप्त करण्यात आले. या प्रकरणी गजानन चालक मालक गजानन दिघे रा.ढालकाठी, ता.महाड, निलेश साळवी रा.रेपोली, सह आरोपी दिपक महाडीक रा.दापोली ता.महाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वन विभागाचे उपवन संरक्षक आप्पासाहेब निकम, सहायक वन संरक्षक विश्‍वजित जाधव यांच्या मार्गदर्शना खाली वन क्षेत्रपाल फिरते पथक रोहा इच्छांत कांबळी, अजिंक्य कदम पोपट करांडे व अन्य सहाकार्‍यांनी सदरची कारवाई केली.

Exit mobile version