नागरिकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ
। कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यात नामवंत असलेली तसेच बारमाही वाहणार्या कुंडलिका नदीपात्रात मोठ्या प्रमाणत घनकचरा टाकण्यात येत आहे. कुंडलिका नदीपात्रात घनकचरा टाकल्यामुळे असंख्य नागरीकांना दूषित पाण्याला सामोरे जावे लागत आहे. यावर कारवाही कोण करणार, असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीच्या तीरावर कोलाडपासून रोह्यापर्यंत अनेक गावे वसलेली आहेत. तसेच, रोहे शहरासह असंख्य गावांना याच नदीतून पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यासोबतच लाखो नागरिकांची तहान भागवणार्या कुंडलिका नदीवर अनेक जणांचे उदरनिर्वाह सुरू असून भातशेती बरोबरच विविध प्रकारचे जोड व्यवसाय व उद्योग चालत असतात. परंतु, कोलाड ते पाले बुद्रुक दरम्यानच्या या नदीपात्रात वाहत असलेला वेगवेगळा घनकचरा यात प्लास्टिक पिशव्यांचा वापर करून त्यात अनेक व्यावसायिक, भाजीवाले, फळ विक्रेते, चिकन व मटण दुकानदार या सर्वांचा जो काही घनकचरा आहे तो सर्रासपणे या नदीपात्रामध्ये फेकला जातो. यामुळे कुंडलिका नदीच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होत आहे. आणि हेच दूषित पाणी येथील नागरिकांना प्यावे लागत असल्याने सर्वत्र बोंब सुरू आहे.
या दूषित पाण्यामुळे अनेक नागरिकांना गंभीर त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचे गांभीर्य संबधीत अधिकारी प्रशासक यांनी घेतले पाहिजे, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.
कोलाड परिसर आणि रोहा परीसरात गणपती उत्सव काळात नदीचे पाणी दूषित होऊ नये म्हणुन स्थानिक रेस्न्यु टीमच्या माध्यमातून सर्वत्र निर्माल्य संकलन करण्याचे काम कऱण्यात आले. त्यांनी त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली. परंतु, कोलाडमधील अनेक व्यावसायिक, भाजीवाले, फळ विक्रेते, चिकन व मटन दुकाने या सर्वांचा जो काही कचरा आहे तो सर्रासपणे या नदीपात्रामध्ये फेकला जातो. यापासून नदीच्या पाण्याची गुणवत्ता फार दूषित होत चालली आहे. तसेच, जैवविविधतेवर याचा फार मोठा घात होत आहे. या नदीमध्ये अति दुर्मिळ माशांच्या प्रजाती आढळून येतात, त्या फक्त आपल्या कुंडलिका नदीमध्येच आढळतात, अशा जीवांचे अस्तित्व संकटामध्ये आले आहे. तसेच, अनेक गावांना याच नदीपात्रातून पिण्याचे पाणी पुरवले जाते. यामुळे नागरिकांनी घनकचरा नदीपात्रात न टाकता त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.
– डॉ. मंगेश सानप, सामाजिक कार्यकर्ते, कोलाड