मुरूडच्या मच्छिमारांवर मोलमजुरी वेळ

कोळी बांधवा अनेक समस्येंच्या गर्तेत; पुढील दोन महिने पोटापाण्याचा प्रश्न

| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |

दरवर्षी प्रमाणे यंदाही हवामान खात्याकडून खोल समुद्रातील मासेमारी दि.31 मे पासून बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, यंदा मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच खराब हवामान, मासळीचा दुष्काळ त्यातच मुरूड समुद्रकिनारी असलेल्या विविध समस्यांना तोंड देणाऱ्या मच्छिमारांना आपली बोट हंगाम संपण्याआधीच किनाऱ्यावर शाकाराव्या लागल्या. यंदाचा खराब हंगाम आणि पुढील 3 महिने मासेमारी बंद असल्याने कोळी बांधव हैराण झाले आहेत. सध्या युवावर्ग समुद्रकिनारी रापण करून मासे पकडत असतात. त्यातही समुद्रात ऑइल आल्याने ती मासळीदेखील मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून सकाळी उठून त्यांच्यावर मोलमजुरीवर जाण्याची वेळ आली आहे.

मुरुड व एकदरा येथील मच्छिमार अजूनही पारंपरिक पद्धती वापरून मासेमारी करतो. अद्यावत जाळी व बोटी तसेच विकसित मासळी शोधक यंत्राचा वापर ते करत नाहीत. कारण मिळालेली मासळी विकण्यासाठी मुरुड शहरात कोणतीही मोठी बाजारपेठ नाही आणि मासळी साठवण्यासाठी कोल्ड स्टोअरेज देखील नाही. तसेच, गेली 50 वर्षे झाली मासेमारीसाठी आरक्षित उद्यावत बंदर नाही. बोटी लावण्यासाठी त्यांना जेट्टी देखील नाही. त्यामुळे त्यांना आजही बोटी किनाऱ्यावर वाळूत लावाव्या लागत आहेत. मुरुड व एकदरा खाडीत फिशरीज खात्याने 7 कोटी खर्च करून खाडीतील गाळ काढला होता. तसेच, एकदरा येथे मासळी सुकवण्यासाठी जेट्टी देखील बनविण्यात आली होती. मात्र, त्यावेळी स्थानिक कोळी बांधवना विचारात न घेता बांधण्यात आलेल्या या जेट्टीला बोटी लागत नाही. तसेच, खाडीतील काढलेला गाळ 2 वर्षांत पुन्हा पूर्वीपेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे ओहोटीला कोळी बांधवांच्या बोटी समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत अडकतात व बोटींचे मोठे नुकसान होते. दरम्यान, आता कोळी बांधवनसाठी ग्रॉइन बंधाऱ्याचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे त्याचा किती फायदा होणार, ते आता येत्या काळात समजेल.

त्यातच यंदाचा हंगाम देखील कोळी बांधवांचा खराबच गेला आहे. त्यामुळे हंगाम संपण्यापुर्वीच त्यांना आपल्या बोटी समुद्रकिनारी शाकाराव्या लागल्या. यावेळी मुरूडमधील तब्बल 400 यांत्रिक बोटी किनाऱ्यावर ओढण्यात आला. त्यामुळे पावसाळ्यातील उरलेले दोन महिने कशे घालवायचे, हा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे. सध्या युवावर्ग समुद्रकिनारी रापण करून मासे पकडत असतात. त्यात खडकातील चिंबोरी, बोंबील व इतर छोटी मासळी भेटते. त्यातही समुद्रात ऑइल आल्याने आणि पावसाने जोर धरल्याने ती मासळीदेखील मिळेनाशी होते. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून सकाळी उठून त्यांच्यावर मोलमजुरीवर जाण्याची वेळ आली आहे. पूर्वी मुरुड बाजारपेठेत आर्थिक उलाढाल करणारा कोळी समाज आज आर्थिक कोंडीत सापडला आहे.

Exit mobile version