रुग्णांवर बाटलीबंद पाणी घेण्याचा भुर्दंड
| तळा | प्रतिनिधी |
तळा ग्रामीण रुग्णालय सुरु झाले असले तरी प्यायला पाणी मिळत नसल्याने येथील रुग्णांवर चक्क बाटलीबंद पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. यामुळे उपचारासाठी येणार्यांचे अतोनात हाल होत आहेत. महिला बालकल्याण विकासमंत्र्यांच्या मतदारसंघात अशी परिस्थिती असल्याने खेद व्यक्त होत आहे.
दुर्गम आणि डोंगराळ म्हणून तळा तालुक्याची ओळख आहे येथे दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे सर्वसामान्य बांधवांच्या खिशाला पैशांची नेहमीच चणचण भासते. यामुळे खेड्यापाड्यातून येणारा बांधव कसाबसा गाडीभाडे करून मोफत उपचार म्हणून ग्रामीण रुग्णालयात धाव घेतो. परंतु, या ठिकाणी रुग्णांना सुविधा मिळत नसून, रुग्णालय सुरू झाल्यापासून पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट आहे, असे सांगण्यात येते. त्यामुळे रुग्णालयात तपासणीसाठी येणार्या रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथे भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनादेखील पाणी विकत घ्यावे लागत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
आज सहा महिने उलटून गेले; परंतु येथे पाणी नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णालयातील डॉक्टर व काही कर्मचारी स्वखर्चाने कशीबशी रुग्णांची तहान भागवण्यासाठी मदत करत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे.
ग्रामीण रुग्णालयात नळ कनेक्शनसाठी तळा नगरपंचायत प्रशासनाला सहा महिन्यांपूर्वी पत्र देण्यात आले आहे. त्यांनी जोडणी करून देतो असे सांगितले आहे; परंतु पुढचा खर्च रुग्णालयाला करण्यास सांगितले आहे. मात्र, रुग्णालयाला अद्याप ग्रँड मिळालेली नसल्याने विकतचे पिण्याच्या पाण्याचे जार मागवित आहोत.
डॉ. सचिन गोमसाले, ग्रामीण रुग्णालय, तळा