आमदारांच्या सांगण्यानूसार केला दरोड्याचा प्लान?
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यात गेल्या आठवड्यात दीड कोटी रुपयांच्या दरोडाप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये आमदारांचे सुरक्षा रक्षक तसेच घरकाम करणार्यांसह अन्य दोघांना म्हणजेच एकूण सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात स्थानिक आमदारांचे लागेबांधे असल्याच्या चर्चेनंतर आता आमदारसाहेबांचे गुन्हेगारांना आशीर्वाद देतानाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. लोकप्रतिनिधीच गुन्हेगारांना पोसण्याचे काम करीत असल्यामुळे सध्या रायगड जिल्ह्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. परिणामी, जिल्ह्यात गुन्हेगारी वृत्ती वाढत चालली आहे.
अलिबागच्या गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे, तर सामाजिक सुरक्षिततेचा आलेख झपाट्याने घसरत आहे. डिझेल तस्करीमुळे सागरी सुरक्षेबाबतची चिंता वाटण्याजोगी परिस्थिती आहे. गुन्हे आणि गुन्हेगारांचे नवनवे प्रकार समोर येत आहेत. सध्या संपूर्ण रायगड जिल्ह्यात चर्चेत असलेले दरोडा प्रकरण आमदारांना गोत्यात आणणारं ठरत आहे. दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपी समाधान पिंजारी याला आशीर्वाद देतानाचे फोटो व्हायरल झाल्याने नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारांसोबत आमदारांचे असलेले कनेक्शन नागरिकांसमोर येत आहे. तडीपार असलेले गुंड, त्यानंतर डिझेल तस्कर राजू पंडीत, याच्यानंतर दरोडेखोर समाधान पिंजारी यांच्यासारख्या अनेक गावगुंडांना पोसण्याचे काम आमदार करीत असल्याचा आरोपही नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, विविध अवैध गुन्ह्यांत होत असलेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीसही आपल्या जबाबदार्या, कर्तव्य विसरल्याच्या भावना नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक लोकप्रतिनिधींची दबावशाही न जुमानता आक्रमक भूमिका घेऊन जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
गृहविभागाची कारवाई कधी?
मंत्रिमंडळात कलंकित चेहरे नको तसेच लोकप्रतिनिधी म्हणूनही स्वच्छ प्रतिमा असावी, अशी ठाम भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. त्यानुसार शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातील काही नावे निवडणुकीतून व त्यानंतर मंत्रीपदाच्या यादीतूनही वगळण्यात आली होती. या निर्णयाचे मतदारांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. मात्र, सत्ताधारी पक्षाला न जुमानता भाजपच्या मित्रपक्षांचे आमदार गुंडांना पोसण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे गुन्हेगारीवृत्तीला वाव देणार्या मित्रपक्षांच्या आमदारांवर अंकुश ठेवण्यात गृहविभाग सपशेल फोल ठरले असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
पोलिसांचे कृषीवलला पत्र; 5 फेब्रुवारीपासूनचा सांगितला घटनाक्रम
दरोडा प्रकरणात रोज नवे खुलासे होत असून, आता कृषीवलच्या हाती पत्र लागले आहे. या पत्रात दिलेल्या माहितीनुसार, अलिबाग पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने कर्मचार्याला दालनात बोलावून घेतले. तसेच समाधान पिंजारी हा आमदार दळवी यांच्या घरी काम करीत असून, त्यांच्याकडे दिवसभर खोटी चौकशी करण्यास सांगितले. तसेच याबाबतची नोंद स्टेशन डायरीत करण्यासही सांगितले. वरिष्ठांच्या आदेशानुसार, कर्मचार्याने चौकशी सुरु केली. मात्र, समाधान उडवाउडवीची उत्तरे देत होता. याबाबत वरिष्ठांना सांगितल्यानंतर वरिष्ठांनी आमदार साहेबांना मदत करायची असून, जास्त चौकशी न करता दुसर्या दिवशी त्याला पुन्हा बोलविण्यास सांगितले.
दि. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता समाधान चौकशीसाठी हजर राहिला. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी त्यास विश्वासात घेतले. त्यानंतर त्याने जबाबात दिलेली सर्व हकीगत सांगितली. त्यामध्ये आमदारांसह त्यांच्या सुरक्षा रक्षकांची नावे समोर आली. ही बाब पोलीस कर्मचार्यांनी वरिष्ठांना कळविली. वरिष्ठांनी आमदारांची तसेच पोलीस विभागाची बदनामी होईल, त्यामुळे अधिक चौकशी न करण्याचे आदेश दिले. त्यामुळे चौकशी थांबवून कर्मचार्याने वरिष्ठांच्या सांगण्यानुसार या तथाकथित गुन्ह्यातील फिर्यादींना संपर्क करुन चौकशीकरिता पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर दि.7 फेब्रुवारी रोजी रात्री अचानक पोयनाड पोलीस ठाण्यात या गुन्ह्यात काही कर्मचार्यांची नावे आल्याचे समोर आले. पूर्वीच्या वादाचा राग मनात धरुन पोलीस अधिकार्यांनी कर्मचार्यांना या प्रकरणात अडकविल्याचा उल्लेख त्या पत्रात करण्यात आला आहे. याशिवाय आमदारांचा घरगडी समाधान पिंजारी, पोलीस सुरक्षा रक्षक व अन्य साथीदारांनी हा गुन्हा केल्याचा संशय या पत्राच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. इतकेच नाही तर आमदारांच्या सांगण्यानूसार व योजनेनूसार ही घटना घडल्याचे पत्रात नमूद आहे. याबाबतची सत्यता पोलिसांनाही माहित आहे. जुना राग मनात ठेवून काही अधिकार्यांना अडकविण्यासाठी एका अधिकार्याने हे घडविले असल्याचा आरोप पोलिस कर्मचार्यांच्या कुटूंबियांकडूनही होत आहे.