हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
स्वातंत्र्य दिनानिमित्ताने अलिबाग नगरपरिषदेच्यावतीने शुक्रवारी (दि.14) शहरामध्ये तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9.00 वाजता या रॅलीला सुरुवात होणार असून, देशभक्तीची भावना जागृत करून भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढविण्याच्या दृष्टीने हा नगरपरिषदेने उपक्रम राबविला आहे. दरम्यान, या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन नगराध्यक्ष अक्षया नाईक यांनी केले आहे.
भारतीय स्वातंत्र्य दिन शनिवारी (दि.15) संपुर्ण रायगड जिल्ह्यात साजरा केला जाणार आहे. “हर घर तिरंगा” मोहिमेअंतर्गत अलिबाग नगरपरिषदेच्यावतीने शुक्रवारी (दि.14) तिरंगा बाईक रॅलीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ही बाईक रॅली नगराध्यक्ष अक्षया नाईक यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग शहरात निघणार आहे. यावेळी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, बांधकाम सभापती प्रशांत नाईक, वेगवेगळ्या समितीचे पदाधिकारी, सदस्य, नगरसेवक तसेच मुख्याधिकारी सागर साळुंखे, नगरपरिषदेतील अधिकारी, कर्मचारी, शहरातील नागरिक, महिला, तरुण, तरुणी या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. अलिबाग शहरातील नगरपरिषदेच्या कार्यालय परिसरातून रॅलीला सुरुवात होणार असून, ही रॅली लिलॅक हॉटेल मार्गे बस स्थानक, महावीर चौक, ब्राह्मणआळी (राममंदिर), युनियन बँक ऑफ इंडिया कार्यालय, जूनी नगर परिषद कार्यालय, बालाजी नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जूनी बाजारपेठ, जामा मशिद, मारुती नाका, पोस्ट कार्यालयामार्गे अलिबाग समुद्रकिनारा अशी ही रॅली काढली जाणार आहे. यादरम्यान, प्रत्येक दुचाकीवर भारताचा राष्ट्रध्वज फडकणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून देशभक्तीची भावन जागरूक करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
