दिव्यांगांच्या समस्यांचे निराकरण करणार

| उरण | वार्ताहर |

उरण शहर आणि ग्रामीण भागात जवळजवळ बाराशे दिव्यांग बांधव आहेत. कुटुंब प्रमुख दिव्यांग बांधवांना तसेच लाभधारक कुटुंबातील सदस्य (दिव्यांग व्यक्ती) यांना मागील तीन महिन्याची संजय गांधी निराधार योजनेची पेंशन मिळाली नाही. काही दिव्यांग बांधवांना आजतागायत पिवळे रेशनकार्ड कार्ड न मिळाल्याने दिव्यांग बांधवांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सदर समस्यांचे निराकरण करावे या आपल्या मागणीसाठी तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांच्या उपस्थितीत उरणचे तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांच्या दालनात नुकतीच भेट घेऊन आपल्या मागण्या संदर्भात चर्चा केली.

यावेळी तहसीलदार डॉ उध्दव कदम यांनी दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेऊन त्याचे लवकरच लवकर निराकरण करण्याचे आश्वासन दिले. तसेच कुटुंब प्रमुख दिव्यांग व्यक्तीला कसेही करून 1500 रुपये पेंशन मिळेल व पिवळे रेशनकार्ड बनवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी दिव्यांग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र म्हात्रे, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, योगेश पाटील, महेश पाटील, मच्छिंद्र मढवी, अस्मिता म्हात्रे, राजश्री घरत, विद्या हळदनकर , रचना ठाकुर, प्रियंका कनोजिया, मिलटन मिरंडा,नितीन सांगविकर, आप्पासाहेब वाहुळे, संदेश राजगुरू तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, प्राध्यापक मढवी उपस्थित होते.

Exit mobile version