आईला समजून घेण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना; निष्ठा निशांतने व्यक्त केला प्रवास
। अलिबाग । वर्षा मेहता ।
प्राईड महिना म्हणजे नेमकं काय, या महिन्याबाबत ग्रामीण भागात फारशी माहिती नसली तरी शहरी भागात या महिन्याबाबत, त्यांच्या संघर्षाबाबत जनजागृती झालेली दिसून येते. एलजीबीटीक्यू या समुदाच्या संघर्षाबद्दल, त्यांच्या व्यथा, सरकारदरबारी असलेल्या मागण्याबाबत या समुदायातील प्रतिष्ठित नागरिकांनी कृषीवलसोबत चर्चा केली. त्यांच्या संघर्षाची दखल कृषीवलने घेत त्यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. प्राईड महिन्याच्या निमित्ताने निष्ठा निशांत हिने सांगितलेले सत्य तिच्याच शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
कृषीवलसोबत बोलताना निष्ठाने सांगितले कि, माझ्यासाठी प्राईड महिना हा रोजच असतो. त्यासाठी मला विशिष्ट महिन्याची गरज आहे, असं वाटत नाही. न्यूयॉर्कमध्ये ज्या स्टोन वॉल दंगली झाल्या त्याचे स्मरण म्हणून हा महिना आज सर्वत्र साजरा केला जात आहे. या संघर्षाने आता व्यापक स्वरुप घेतलंय. त्यामुळे तो संपूर्ण जगातही प्रसिद्ध झालाय. प्राईड महिना म्हणजे आपण कोण आहात याबद्दल स्वत:चा अभिमान बाळगणं, परंपरामध्ये न अडकता मुक्तपणे जगणं आणि आपल्याबद्दलच सत्य मान्य करणं हेच असल्याचं निष्ठा निशांत हिने केव्ही न्यूजसोबत बोलताना बिनधास्तपणे सांगितलं.
यापुढे ती म्हणाली कि, मी नवी मुंबईतील एका संस्थेबरोबर काम करते आणि आरोग्य सेवा कर्मचारी आहे. मी बर्याच लिंग-संवेदीकरण कार्यशाळांमध्ये भाग घेते. बर्याच संस्था मला प्रवक्ता म्हणून आमंत्रित करतात. मी नेहमीच व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात संतुलन साधू शकेन, अशा कार्यक्रमांमध्ये भाग घेते.
कलम 377 रद्द करण्यापूर्वीचे आयुष्य खूप कठीण होते. मला आजही तो 6 सप्टेंबर 2018 हा ऐतिहाकसिक दिवस आठवतो. कलम 377 ला दोषमुक्त केले गेले, तेव्हा समुदायातील अनेक सदस्यांच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळत होते. कारण ते आता पूर्णपणे मुक्त झाले, स्वतः कोण आहेत हे जगाला सांगण्याचं बळ त्यांना मिळालं. वर्षानूवर्ष ज्यांनी स्वतःचं वेगळेपण लपवलं, असे सारेच मुक्त झाले.
आता नक्कीच काळ बदलला आहे. लोक एलजीबीटीक्यू + समुदायाच्या लोकांना स्वीकारण्यास, त्यांना समजुन घेण्यास इच्छुक आहेत. न्यायालयीन स्तरावर, बरंच काम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी समुदायाच्या लोकांनी एकत्र यावे व गरज काय आहेत, हे समजून घेतले पाहिजे. समुदाय आणि सरकार या दोन्हीकडून प्रयत्न झाले पाहिजेत. सध्या याबाबतच्या अंमलबजावणीत कमतरता आहे. बरीच जागरूकता निर्माण करावी लागेल. लोकांना योग्यरित्या ते समजवावे लागेल. या गोष्टी भेदभाव कमी करण्यास मदत करतील. कारण आजही या समाजातील अनेक लोकांना भेदभावाचा सामना करावा लागत आहे.
मी वेगळी आहे हे मला वैयक्तिकरित्या माहित होते. मला स्वतःला व्यक्त करण्यासाठी योग्य शब्दावली माहित नव्हती. पण हे देखील माहित होते की, माझ्या बाबतीत काहीतरी वेगळे आहे. मी स्वत: ला स्वीकारण्यासाठी बराच वेळ घेतला. पदव्युत्तर शिक्षण घेत असताना मला आठवते की, मी माझ्या कुटुंबास माझ्या खर्या रूपाबद्दल सांगितलं. त्यावेळी गोष्टी फारशा चांगल्या नव्हत्या. माझ्या आईला समजून घेण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. माझ्या भावासाठी हे समजणे आणि स्वीकारणं सोपं होतं.
शहरी भागात या समुदायाला समजुन घेण्याची पातळी जास्त आहे, हे मी नाकारणार नाही. परंतु ग्रामीण भागात विशेषत: ट्रांसजेंडर छत्राखाली येणार्या सामाजिक, सांस्कृतिक गटांसाठी स्वीकृती पातळी कमी आहे.