तंबाखूमुक्त शाळा फक्त कागदावरच

कर्मचारीच खातात तंबाखूजन्य पदार्थ; शाळेच्या परिसरात खुलेआमपणे विक्री

| रायगड | प्रमोद जाधव |

तंबाखूच्या सेवनाचे दुष्पपरिणाम शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी शाळांमध्ये तंबाखूमुक्त शाळा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मोठा गाजावाजा करीत तंबाखू मुक्त शाळा म्हणून फलक लावले जातात. परंतु, हा सर्व खर्च पाण्यात जात असल्याचे चित्र आहे. तंबाखू मुक्त शाळेतील काही कर्मचारीच गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थ खात असल्याचे समोर येत आहे. तसेच, शाळेच्या शंभर मीटर परिसरात किराणा, पान टपरी दुकानांत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खुले आमपणे विकले जातात. त्याकडे मात्र शाळेतील समितीचे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे. संबंधितांविरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही, ही मोठी चिंतेची बाब आहे.

तंबाखूच्या सेवनाने कर्करोगासह अनेक आजार उद्भवण्याची शक्यता आहे. गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थाच्या आहारी तरुण वर्ग जात आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील तंबाखू व गोवा, गुटखा, विमल सारखे तंबाखूजन्य पदार्थ विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. मात्र, आजही जिल्ह्यातील काही भागांमध्ये 35 ते 40 रुपयांनी विमल, गुटखा या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री छुप्या पद्धतीने केली जात आहे. त्यामुळे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या आहारी तरुणाई जाण्याची भिती निर्माण झाली आहे. काही शाळा, महाविद्यालयातील मुले फॅशन म्हणून तंबाखूजन्य पदार्थ खाण्यावर भर देतात. त्यामुळे हे संकट दूर करण्यासाठी जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कार्यक्रम ही स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली आहे.

शाळा महाविद्यालयात जाऊन या यंत्रणेच्या मदतीने जनजागृती केली जाते. सरकारी कार्यालांमध्येदेखील याबाबत प्रचार व प्रसार करून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊ नका, असे आवाहन केले जाते. जिल्ह्यात आतापर्यंत 401 शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत. 76 शाळा तंबाखू मुक्त शाळेच्या प्रगती पथावर आहे. तंबाखू मुक्त शाळांच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी असून शाळांमधील कर्मचाऱ्यांनी देखील अशा पदार्थांचे सेवन न करणे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच, शाळेच्या आवारात तंबाखूमुक्त शाळेचा फलक लावण्यात आला आहे. परंतु, नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे कारभार चालला जातो. त्यानंतर जैसे थे अशी अवस्था पहावयास मिळत आहे. मोठा गाजावाजा करीत तंबाखूमुुक्त शाळेचा दिखावा केला जात असल्याचे चित्र काही शाळांमध्ये समोर आले आहे. त्यामुळे तंबाखूमुक्त शाळेची नोंद फक्त कागदावर असल्याचे बोलले जात आहे. तंबाखू मुक्त शाळेचा उपक्रम कौतूकास्पद आहे. मात्र, त्यामध्ये सातत्य राखण्यास काही शाळा उदासीन ठरत आहे.

बैठकीला शिक्षणाधिकाऱ्यांची गैरहजेरी
जिल्हा तंबाखू सहनियंत्रण समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. दर तीन महिन्यांनी बैठक घेतली जाते. या समितीमध्ये 15 हून अधिक सदस्य आहेत. त्यात पोलीस यंत्रणेसह शिक्षणाधिकारी, विक्रीकर अधिकारी, अन्न व औषध प्रशासनचे अधिकारी आहेत. आतापर्यंत चार बैठका झाल्या. परंतु, माध्यमिक शाळेतील शिक्षणाधिकारी चारही बैठकीला उपस्थित राहिले नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
Exit mobile version