| रायगड | प्रतिनिधी |
संपूर्ण भारतात तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलेही या विळख्यात आली आहेत. 13 ते 15 वयोगटातील बरीचशी मुले तंबाखूचे व्यसन करतात. त्यामुळे आता राज्यातील शाळांमधील शिक्षकांना तंबाखूमुक्तीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. शाळांना याबाबत जागरुक करून शिक्षकांनी तंबाखूचे सेवन करू नये यासाठी मार्गदर्शन आणि उपचार सांगितले जाणार आहेत.
महाराष्ट्रात संपूर्ण लोकसंख्येच्या 27 टक्के लोकसंख्या तंबाखू सेवनाने होणाऱ्या समस्यांनी त्रस्त आहे; तर भारतात तंबाखूशी संबंधित मृत्यूदर दररोज 3700 व्यक्ती इतका आहे. या भयावह स्थितीचा सामना करण्यासाठी आता महाराष्ट्रातील शिक्षकांना तंबाखू सोडण्यासाठीचा ब्रँड ॲम्बेसेडर करत ‘तंबाखूमुक्त समाज’ या जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात करणार असल्याची माहिती हिलीस या आंतरराष्ट्रीय तंबाखू मुक्त समाज संस्थेचे संचालक डॉ. प्रकाश गुप्ता यांनी दिली. जनजागृती कार्यक्रमांतर्गत शाळांमध्ये तंबाखू नियंत्रणाचे प्रयत्न वाढवण्यासाठी शिक्षकांनाच महत्त्वपूर्ण प्रभावशाली व्यक्ती म्हणून सादर करण्यात येणार आहे.
बिहारमध्ये यापूर्वी तंबाखूमुक्त समाज कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. आता महाराष्ट्रात हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे, असे डॉ. मंगेश पेडणेकर यांनी सांगितले. तंबाखूच्या दुष्परिणामांची गडद छाया महाराष्ट्रात असून 20 टक्के जनतेला तंबाखू सेवनामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागते. मुंबईबरोबरच पुण्यातही तंबाखूमुळे दररोज होणाऱ्या मृत्यूची संख्या खूप मोठी आहे, असे डॉ. मंगेश पेडणेकर यांनी सांगितले. तंबाखूमुळे श्वसनाशी संबंधित समस्या, हृदयविकार आणि विविध प्रकारच्या आरोग्य समस्याही निर्माण होतात. सार्वजनिक आरोग्यावर होणारा हा घातक परिणाम पाहून नावीन्यपूर्ण उपायांची गरज आहे. त्यासाठी तंबाखू मुक्त समाज कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आल्याचे डॉ. पेडणेकर यांनी यावेळी सांगितले.
स्वयं-मदत पुस्तिका बिहारमधील यशानंतर हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात येत आहे. त्यानंतर प्रकल्पाच्या टीमने मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी एक स्वयं-मदत पुस्तिका तयार केली आहे. या पुस्तिकेच्या माध्यमातून शाळांमधील प्रमुखांना तंबाखूच्या वापरापासून मुक्ती मिळवण्यासह शाळांमध्ये तंबाखू मुक्त वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.