नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
| अलिबाग | प्रतिनिधी |
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडण्याचा धोका वाढू लागला आहे. शाळा, सरकारी कार्यालये व अन्य सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाण्यांविरोधात कारवाई या नियंत्रण पथकाद्वारे केली जात असून जनजागृती देखील केली जात आहे. मात्र कुंपणच शेण खात असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील काही कार्यालयाचा परिसर, सार्वजनिक ठिकाणी गोवा, गुटखा व अन्य तंबाखुजन्य पदार्थ विक्रीला उत आला आहे. त्यामुळे तंबाखु मुक्ती फक्त कागदावरच असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
वाढत्या औद्योगिकीकरणाचा फायदा घेत काही अनाधिकृत व्यवसायिक खुलेआमपणे गुटखा, गोवा व अन्य तंबाखुजन्य पदार्थ विकत आहेत. या तंबाखुजन्य पदार्थांचा वापर जिल्ह्यात वाढत आहे. तरुणाई या तंबाखुजन्य पदार्थाच्या आहारी जात आहे. विमल, गुटखा, गोवा सारख्या तंबाखूजन्य पदार्थ विक्रीला बंदी असतानाही जिल्ह्यात राजरोसपणे विक्रीचा व्यवसाय सुरु आहे. गुटखा माफिया नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत.
जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी प्रशासनाकडून पुढाकार घेतला जात आहे. गोवा, गुटखा व अन्य तंबाखु जन्य पदार्थ विक्री व वाहतूकीवर बंदी घातली जात आहे. खासगी, सार्वजनिक ठिकाणी फलक लावून तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणामाची माहिती दिली जात आहे. तरीदेखील काही गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री सुरु आहे. काही ठिकाणी किराणा दुकान, पान टपरी, रेल्वे स्थानक, बस स्थानक व बाजारपेठांसह रुग्णालय आदी परिसरात गुटखा, गोवा व अन्य तंबाखुजन्य पदार्थ विक्री होत आहेत. काही ठिकाणी तर पोलीस ठाणे व अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाच्या काही अंतरावर देखील तंबाखुजन्य पदार्थांची विक्री सुरुच आहे. काही जण अंडे विकण्याच्या बहाण्याने तर काही जण टेम्पो, रिक्षा, कारमधून गुटखा सारख्या तंबाखुजन्य पदार्थांची वाहतूक करीत आहेत. या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री, वाहतूकीने जिल्हयाला विळखा घातला आहे. मुंबईतून पेणमध्ये धागेदोरे असून मागणीनुसार दुकानदारांना हे पदार्थ पोहचविण्याचे काम केले जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गुटखा माफियांच्या वादात टपरीवाल्यांचा बळी रायगड जिल्ह्यातील अनेक भागात गुटखा माफियांनी सुळसुळाट सुरु केला आहे. मुंबईतून, पेण, नागोठणे या भागातून वेगवेगळ्या ठिकाणी गुटखा, विमल सारखे तंबाखूजन्य पदार्थ दुकानदारांपर्यंत पोहचविले जात आहेत. मात्र सध्या गुटखा, विमल हे तंबाखूजन्य पदार्थ दुकानदारांपर्यंत पोहचविणारे मुख्य सुत्रांधारांमध्ये वाद निर्माण झाला आहे. एकमेकांच्या वादात टपरी वाल्यांचा बळी पडू लागला आहे. एकमेकांविरोधात पोलीसांच्या मदतीने कारवाई केली जात आहे. त्यामुळे वादामुळे कायदा व सुव्यवस्था धोका असल्याची भिती नागरिकांनी व्यक्त केली आहे.