। ठाणे । प्रतिनिधी ।
वसई पश्चिमेकडील एका सोसायटीत धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांसोबत झालेल्या किरकोळ वादाचा सूड घेण्यासाठी एका नराधमाने चार वर्षांच्या निष्पाप चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला केला. ही सर्व घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या या चिमुकल्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरोपीला वसई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वसई पश्चिमेकडील अनुपम घर संकुल सोसायटीत अतुल कोंढारे आपल्या कुटुंबासह राहतात. याच सोसायटीत राहणारा रिक्षाचालक संदीप पवार याच्याशी कोंढारे यांचा काही दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता. या भांडणाचा राग मनात धरून संदीपने कोंढारे यांच्या चार वर्षीय मुलावर जीवघेणा हल्ला केला. विघ्नेश असे त्या मुलाचे नाव असून तो सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सोसायटीच्या आवारात खेळत होता. यावेळी संदीपने विघ्नेशला पकडले आणि त्याचे डोके रिक्षाच्या लोखंडी अँगलवर जोरात आपटले. त्यानंतर त्याला फरफटत नेत पहिल्या मजल्यावरील शिडीवर नेऊन पुन्हा मारहाण केली. विघ्नेशची आजी त्याला वाचवण्यासाठी धावून गेली असता नराधमाने त्यांनाही मारहाण केली. ही सर्व घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या हल्ल्यात विघ्नेश गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला आणि शरीराला अंतर्गत मोठ्या जखमा झाल्या आहेत. सध्या त्याच्यावर मिरा रोड येथील एका खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर वसई परिसरात संतापाची लाट उसळली आहे. घटनेची माहिती मिळताच वसई पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.







