खारबंदिस्तीबाबत टोलवाटोलवी; खारभूमीच्या अधिकार्‍यांचे जेएसडब्ल्यूकडे बोट

। पेण । वार्ताहर ।
नारवेल बेनवले या खारबंदिस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. वारंवार तक्रारी होऊनदेखील ना लोकप्रतिनिधी लक्ष देत, ना अधिकारी जेएसडब्ल्यू कंपनी जे ड्रेजींग करत आहे, त्याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. आम्ही आमच्या वरिष्ठांनादेखील जेएसडब्ल्यूमुळेच लॅन्ड स्लॅयडींग होत असल्याचे कळवले आहे. वरिष्ठ त्यावर योग्य तो मार्ग शोधतील. एकदंरीत काय तर, नित्कृष्ट दर्जाचे काम वाचविण्यासाठी खारलँडच्या अधिकार्‍यांनी जेएसडब्ल्यूकडे बोट दाखविले आहे. परंतु, याबाबत जेएसडब्ल्यूच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता उत्तर देणे टाळले.

दरम्यान, बहिरम कोटक येथील शेतकर्‍यांनी जेव्हा आत्मदहनाचा इशारा प्रशासनाला दिला, त्यावेळी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी घटनास्थळी बहिरम कोटक येथे पोहोचले, त्यावेळी कनिष्ठ अभियंता दादासाहेब सोनटक्के व ठेकेदाराचे सुपरवायझर अमोल पाटील हे हजर होते. त्यांना खाबंदिस्तीच्या कामाच्या नित्कृष्ट दर्जाविषयी विचारणा केली असता, त्यांनी काम व्यवस्थित अंदाजपत्रकानुसार चालले आहे, असे उत्तर दिले. परंतु, ज्या वेळेला अंदाजपत्रकानुसार मुरुमाचा थर किती इंचाच आहे, असा प्रश्‍न केल्यावर मात्र ठेकेदाराच्या माणसाची व कनिष्ठ अभियंताची बोलती बंद झाली. त्यांना मोजपट्टी लावून मुरूमाचा थर किती आहे तो दाखवला. नियमानुसार 12 इंच (1 फूट) असणे गरजेचे होते. परंतु, ज्या वेळेला मोजपट्टी लावली व मुरुमाच्या थराची उंची मोजली, तर ती जेमतेम दोन ते अडीच इंच एवढी भरली. तेव्हा मात्र अधिकार्‍यांनी पलटी मारत काम अजून पूर्ण व्हायचे आहे, जेव्हा काम पूर्ण होईल, तेव्हा एक फुटाचा थर मुरूमाचा असेल. एकीकडे 75 टक्के काम पूर्ण झाले असल्याचे वरिष्ठांना सांगत आहेत. आणि, दुसरीकडे अजून काम पूर्ण झाले नाही, असेही अधिकारी सांगतात. नक्की काय चालय, हेच समजत नाही. मात्र, एवढे नक्की, की नारवेल बेनवले खारबंदिस्तीचे काम नित्कृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे वारंवार बंदिस्ती खाडीच्या बाजूने घसरत आहे.

सोनटक्के यांना बंदिस्ती खाडीच्या बाजूने घसरत असल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी असे सांगितले की, हे जेएसडब्ल्यू कंपनी जे धरमतरच्या खाडीमध्ये ड्रेजींग करत आहे, खोदकाम करत आहे, त्याने मुख्य खाडी एकदम खोल गेलेली आहे, तर ओहोटीचे पाणी जोरात वाहते, त्याला मंथन गती प्राप्त होते. मंथन गतीमुळे बांधाच्या फाऊंडेशनमधील माती वाहून जाते आणि फाऊंडेशनमधली माती वाहून गेली की वरच्या लोडने बांध खाडीमध्ये आतमध्ये घसरत आहे. असे नारवेल बेनवले खारभूमी योजनेच्या 17 मीटरमध्ये होत आहे. तर, याला वेगळी ट्रिटमेंट करणे गरजेचे आहे. त्याला गडगे आम्ही टाकलेले आहेत, हे अंदाजपत्रकामध्ये नसतानाही ठेकेदाकडून केलेले आहेत. तर, ते आणखी मजबूत करणे गरजेचे आहे. आम्ही मंजुरीनंतर ते मजबूत करून घेऊ, मात्र जेएसडब्ल्यू कंपनी जे ड्रेजींग करत आहे, त्याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. आणि आम्ही आमच्या वरिष्ठांनादेखील जेएसडब्ल्यूमुळेच लॅन्ड स्लॅयडींग होत असल्याचे कळवले आहे. वरिष्ठ त्यावर योग्य तो मार्ग शोधतील. एकंदरीत काय, तर निकृष्ट दर्जाचे काम वाचविण्यासाठी खारलँडच्या अधिकार्‍यांनी जेएसडब्ल्यूकडे बोट दाखविले आहे.

खरंच जेएसडब्ल्यूच्या डे्रजींगमुळे लँड स्लॅयडींग होऊन बंदिस्ती वाहून जात आहे का? याबाबत जेएसडब्ल्यू कंपनीचे जनसंपर्क अधिकारी आत्माराम बेटकेकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क केले असता त्यांनी आपल्या ठेवणीतील काही उत्तरे दिली. परंतु, खारलँडच्या अधिकार्‍यांच्या आरोपाविषयी बोलणे टाळले. दोन दिवसांनंतर योग्य माहिती घेऊन सांगतो, असे सांगितले. म्हणून गुरुवारी बेटकेकर यांना वारंवार भ्रमणध्वनीवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचा फोन बंद येत होता.

Exit mobile version