| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी लि. अलिबाग या संस्थेचा शतक महोत्सव रविवारी (दि.14) अलिबागमध्ये साजरा करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण व सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी आ. जयंत पाटील, खासदार धैर्यशील पाटील, खासदार सुनील तटकरे महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा सकाळी 11 वाजता कुरुळ येथील क्षात्रैक्य समाज हॉल येथे साजरा करण्यात येणार आहे. सहकार भारतीचे महामंत्री विवेक जुगादे हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी संचालक, विद्यमान संचालक, प्रत्येक तालुक्यातून दोन आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. पाककला व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
संस्थेमध्ये आतापर्यंत एक हजार 300 हून अधिक सभासद असून संस्थेचा वार्षिक उलाढाल 118 कोटी रुपये इतकी आहे. मृत्यू फंड, दुर्धर आजार असलेल्या सभासदांना संस्थेच्या माध्यमातून आर्थिक मदत, सेवानिवृत्त सभासदांना सेवानिवृत्त मानधन, सभासद पाल्यांना शैक्षणिक मदत, कन्यादान योजना तसेच प्रत्येक सभासदाला तीस लाख कर्ज देण्याचे काम केले जात आहे, असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.







