तोंडलीचे भाव घसरले; शेतकरी आर्थिक संकटात

। अलिबाग । प्रतिनिधी ।

भातपिकाला पर्याय म्हणून अलिबाग तालुक्यातील अनेक भागात तोंडलीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. तोंडलीला बहर आला असून, बाजारात तोंडलीला प्रचंड मागणी आहे. मात्र, तोंडलीचे भाव घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तोंडली कळी 18 रुपये व जाडी सुमारे 4-5 रुपयांनी विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. त्यामुळे मेहनत, औषध फवारणी आदींचा खर्चदेखील सुटत नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

अलिबाग तालुक्यात तोंडली उत्पादन काढले जाते. तालुक्यात तोंडलीचे क्षेत्र 232.80 हेक्टर आहे. सुमारे 855 शेतकरी तोंडली उत्पादक आहेत. पावसाळा संपल्यावर नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून तोंडलीची लागवड केली होते. तोंडलीचे मांडव उभारून यातून उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न शेतकरी करतात. जाडी व कळी तोंडली अशा दोन प्रकारामध्ये तोंडली बाजारात वेगवेगळ्या भावामध्ये विकली जाते. अलिबाग तालुक्यात शेतकर्‍यांनी नोव्हेंबरपासून तोंडलीची लागवड करण्यास सुरुवात केली. परंतु, अवकाळी पावसामुळे शेतकरी भयभीत झाला होता. मात्र, कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार केलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांमुळे तोंडली उत्पादक शेतकर्‍यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. तालुक्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून तोंडलीच्या उत्पादनात भरमसाठ वाढ होऊ लागली आहे. तोंडलीला प्रचंड मागणी वाढू लागली आहे. वाशीमधील बाजारात तोंडलीला प्रचंड मागणी वाढली आहे. मोठ मोठ्या हॉटेलमध्ये पुलाव व अन्य पदार्थ तयार करण्यासाठी तोंडलीला पसंती अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. वाढती मागणी व वाढत्या उत्पादनामुळे तोंडलीच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. जाडी तोंडली पाच रुपयेे किलो, तर कळी 18 रुपये किलोने विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

जानेवारीपासून तोंडली बाजारात विक्रीला सुरुवात झाली. सुरुवातीला उत्पादन कमी असल्याने किंमतही वाढली होती. किलोमागे शेतकर्‍यांना 50 ते 65 रुपये मिळत होते. रोज सुमारे दहा टन तोंडली वाशी बाजारात अलिबागमधून पाठविली जात आहे. त्याचा फायदा शेतकर्‍यांना चांगला होत असला, तरीही गेल्या अनेक दिवसांपासून तोंडलीच्या उत्पादन व मागणी वाढल्याने किमतीत घसरण झाली आहे. तोंडलीला भाव कमी मिळत असल्याने शेतकरीवर्गामध्ये नाराजीचे सूर उमटत आहे. काबाडकष्ट करूनदेखील तोंडलीला भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांसमोर मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे.

तोंडलीचे उत्पादन वाढले असून, मागणीही प्रचंड आहे. परंतु, दर कमी झाले आहेत. तोंडलीचे भाव कमी झाल्याचा फटका तोंडली उत्पादक शेतकर्‍यांना बसू लागला आहे. सरकारने भाताचे ज्याप्रमाणे केंद्र सुरु केले आहे, त्याप्रमाणे केंद्र सुरु करून तोंडलीला हमी भाव जाहीर करावा जेणेकरून तोंडली उत्पादक शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने न्याय मिळेल.

प्रभाकर नाईक, तोंडली उत्पादक शेतकरी

यंदा तोंडलीला उत्पादन चांगले आहे. वाशी बाजारात तोंंडलीला मागणी वाढली आहे. मात्र, तोंडलीचे भाव घसरले आहेत. भाव मिळत नसल्याने शेतकरीवर्गासमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे.

शैलेश नाईक, तोंडली व्यावसायिक

मोठ मोठ्या हॉटेलमध्ये तोंडलीला मागणी अधिक आहे. गेल्या दोन दिवसांपासून तोंडलीचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान शेतकर्‍यांचे होत आहे.

रंजन म्हात्रे, शेतकरी 
Exit mobile version