| महाड | सुजित धाडवे |
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण जिल्ह्यात जल्लो षाचे वातावरण होते. ठिकठिकाणी महाराजांच्या पराक्रमाचे पोवाडे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाड तालुक्यातील दासगाव येथील दौलतगडावर शिवजयंतीनिमित्त 400 मशाली पेटविण्यात आल्या होत्या. त्यामुळे गडाचा संपूर्ण परिसर उजळून निघाला होता.
दौलतगड प्रतिष्ठानच्यावतीने या किल्याच्या संवर्धनासाठी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, शिवजयंती निमित्त शुक्रवारी (दि.6) रात्री 9.00 वाजता दौलतगडावर मशाली पेटवून फटाक्यांची आतिषबाजी करून मशाल महोत्सव साजरा झाला. यावेळी गडावर 200 मशाली लावून ‘जाणता राजा’ हे नाव तयार करण्यात आले होते. पहिल्या वर्षी 100 मशाली, दुसऱ्या वर्षी 250, तिसऱ्या वर्षी 350, तर यंदा 400 मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. दौलत गड प्रतिष्ठान आणि रॉयल रायगडकर प्रतिष्ठानच्या सर्व दुर्गसेवकांच्या अथक परिश्रमाचे फळ म्हणजेच ‘जागर दौलतगडाचा’ हा मशाल महोत्सव आहे, असे निलेश निवाते यांनी सांगितले.
या सोहळ्यात दौलतगड भूषण पुरस्काराचे वितरणही करण्यात आले. यामध्ये गड संवर्धनासाठी कर्तव्य जाधव, क्रीडा क्षेत्रातील कबड्डी या खेळात अमर निवाते, कला क्षेत्रामध्ये सोहम नागवेकर, रांगोळी चित्रकला यामध्ये शैलेश निंबरे, क्रीडाक्षेत्र क्रिकेट यामध्ये अनुज निवाते आणि शैक्षणिक-वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर तन्वी मिंडे यांचा सन्मान करण्यात आला.
रायगड किल्ल्याच्या सेवेसाठी तत्पर असलेला दौलतगड शासनाकडून दुर्लक्षित झाला आहे. शासनाला या किल्ल्यासंदर्भात जाग येण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम करत असताना शासनाकडून या किल्ल्याच्या संवर्धनासाठी एकही रुपयाचा निधी प्राप्त झाला नाही. आम्ही या किल्ल्यासंदर्भात दरवर्षी अशीच प्रथा सुरू ठेवणार आहोत.
निलेश निवाते, संस्थापक अध्यक्ष, दौलतगड प्रतिष्ठान,
