पेणमधील विदारक चित्र;पक्का रस्ता नसल्याने झोळीचा वापर
| पेण | प्रतिनिधी |
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारराजाला पुढील पाच वर्षांची रंगीत स्वप्ने दाखविण्यात राजकीय पक्ष मशगुल असताना सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालेल असे विदारक चित्र पेण तालुक्यात समोर आले आहे. एका अभागी आदिवासी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिचा मृतदेह घरापर्यंत नेण्यासाठी मात्र चार किमीची पायपीट करावी लागली. केवळ पक्का रस्ता नसल्याने ही वेळ आदिवासी कुटुंबावर आली. रस्ता तयार करण्यासाठी ठेकेदाराला दिलेले साडेसात कोटी कोणाच्या खिशात गेले, हा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे. पेण शहरापासून हाकेच्या अंतरावर असणार्या खवसावाडीतील ही विदारक काहाणी आहे.
पेण तालुक्यातील खवसा ही छोटी आदिवासीवाडी आहे. या वाडीतील आंबी कडू (42) ही महिला आजारी होती. तिला उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गुरूवारी तिचा मृत्यू झाला. आंबी कडू यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून पेणपर्यंत आणण्यात आला. शहरापासून पाच किमी अंतरावर बोरगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या खवसा आदिवासीवाडीपर्यंत जायला पक्का रस्ताच नाही. त्यामुळे कोणतीही रुग्णवाहिका अथवा खासगी वाहन उपलब्ध झाली नाही. अखेरीस ग्रामस्थांनी झोळी करून मृतदेह खवसावाडीत नेला. याबाबत आदिवासी समाजात संताप व्यक्त होत आहे. या वाडीपर्यंत रस्ता करण्यासाठी दहा महिन्यांपूर्वी 7 कोटी 60 लाखांचे काम ठेकेदाराला देण्यात आले आहे. मात्र, त्याकडे ठेकेदाराने साफ दुर्लक्ष केले. या ठेकेदाराला अधिकार्यांचे अभय असल्याने ठेकेदार काम करीत नसावा, अशी चर्चा आहे.
अधिकारी आले चोरपावलांनी
सदरील घटना झाल्यानंतर दुसर्या दिवशी अधिकारीवर्गाला जाग आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, गटविकास अधिकारी लता मोहिते, कार्यकारी अभियंता राहुल देवांग, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी रवी पोचपोर, उपकार्यकारी अभियंता मनिषा शिद आदींनी चोरपावलांनी खवसावाडी गाठली. मात्र, त्या ठिकाणी ही एका आदिवासी गरोदर महिलेने अधिकार्यांची चांगलीच उजळणी घेतली. मात्र, कामात कामचुकारपणा केल्याने त्यांची बोलती बंद होती.