मृत्यूनंतरही यातना संपेना!

पेणमधील विदारक चित्र;पक्का रस्ता नसल्याने झोळीचा वापर

| पेण | प्रतिनिधी |

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारराजाला पुढील पाच वर्षांची रंगीत स्वप्ने दाखविण्यात राजकीय पक्ष मशगुल असताना सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालेल असे विदारक चित्र पेण तालुक्यात समोर आले आहे. एका अभागी आदिवासी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिचा मृतदेह घरापर्यंत नेण्यासाठी मात्र चार किमीची पायपीट करावी लागली. केवळ पक्का रस्ता नसल्याने ही वेळ आदिवासी कुटुंबावर आली. रस्ता तयार करण्यासाठी ठेकेदाराला दिलेले साडेसात कोटी कोणाच्या खिशात गेले, हा प्रश्‍न आता ऐरणीवर आलेला आहे. पेण शहरापासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या खवसावाडीतील ही विदारक काहाणी आहे.

पेण तालुक्यातील खवसा ही छोटी आदिवासीवाडी आहे. या वाडीतील आंबी कडू (42) ही महिला आजारी होती. तिला उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गुरूवारी तिचा मृत्यू झाला. आंबी कडू यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून पेणपर्यंत आणण्यात आला. शहरापासून पाच किमी अंतरावर बोरगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या खवसा आदिवासीवाडीपर्यंत जायला पक्का रस्ताच नाही. त्यामुळे कोणतीही रुग्णवाहिका अथवा खासगी वाहन उपलब्ध झाली नाही. अखेरीस ग्रामस्थांनी झोळी करून मृतदेह खवसावाडीत नेला. याबाबत आदिवासी समाजात संताप व्यक्त होत आहे. या वाडीपर्यंत रस्ता करण्यासाठी दहा महिन्यांपूर्वी 7 कोटी 60 लाखांचे काम ठेकेदाराला देण्यात आले आहे. मात्र, त्याकडे ठेकेदाराने साफ दुर्लक्ष केले. या ठेकेदाराला अधिकार्‍यांचे अभय असल्याने ठेकेदार काम करीत नसावा, अशी चर्चा आहे.

अधिकारी आले चोरपावलांनी
सदरील घटना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी अधिकारीवर्गाला जाग आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, गटविकास अधिकारी लता मोहिते, कार्यकारी अभियंता राहुल देवांग, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी रवी पोचपोर, उपकार्यकारी अभियंता मनिषा शिद आदींनी चोरपावलांनी खवसावाडी गाठली. मात्र, त्या ठिकाणी ही एका आदिवासी गरोदर महिलेने अधिकार्‍यांची चांगलीच उजळणी घेतली. मात्र, कामात कामचुकारपणा केल्याने त्यांची बोलती बंद होती.

या मतदारसंघामधील वाड्या-वस्त्यांमध्ये आजही पायाभूत सुविधांची समस्या गंभीर आहे. रस्ते, पाणी, वीजपुरवठ्यापासून आदिवासी बांधव वंचित आहेत. आरोग्याची समस्या उद्भवल्यास सुसज्ज रुग्णालय नाही. या सर्वाला जबाबदार इथले नेतृत्व आहे. कारण, त्यांनी या समस्यांवर काहीच काम केलेले नाही. या सर्व गोष्टी येत्या काळात करणे गरजेचे आहे. त्या करण्यास माझे प्रथम प्राधान्य असेल.

अतुल म्हात्रे,
उमेदवार, पेण मतदारसंघ

हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारित नसून, पंतप्रधान ग्रामसडक अंतर्गत आहे.तसेच सिद्धीविनायक कन्स्ट्रक्शन या नावाचा ठेकेदार कोण आहे हे मला माहीत नाही. याबाबत माहिती घेण्यात येईल.

राहुले देवांग,
कार्यकारी अभियंता, जि.प.

गेल्या दोन वर्षांपासून येथील खवसावाडी, काजूचीवाडी, केळीचीवाडी, तांबडी आणि उंबरमाळवाडी या पाचही आदिवासी वाड्यांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. सिध्दिविनायक कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने दहा महिने उलटूनही या रस्त्याचे काम सुरू केलेले नाही. आज या आदिवासी वाड्यांची रस्त्याविना दयनिय अवस्था आहे. काल जो प्रकार झाला, तो फक्त आणि फक्त राजकीय उदासीनतेचे एक उदाहरण आहे. ठेकेदारच्या मागे राजकीय वरदहस्त असल्याशिवाय ठेकेदार मनमानी करु शकत नाही.

संतोष ठाकूर,
अध्यक्ष, ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था

मागील वर्षी ठेकेदाराने रस्त्यासाठी थोडा भराव टाकला होता. मात्र, पावसाळ्यात तो धुवून गेला. रस्ताच नसल्याने जीवनावश्यक वस्तूंसाठी पाच किलोमीटर पायपीट करावी लागते.

काळ्या पद्मा कडू,
ग्रामस्थ, खवसावाडी पेण

Exit mobile version