रोह्यात मराठ्यांचा आवाज दणाणला
आरक्षण आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा, एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी मंगळवारी रोहा शहर अक्षरशः तालुका दणाणला. मंगळवारपासून सुरू झालेला तीन दिवशीय मराठा आरक्षण, मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषणात उपस्थित शेकडो मराठा बांधव, भगिनीनी रोहा नगरपालिका समोरील प्रांगणात मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सहभागी झाल्या होत्या.
रोहा सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण मंगळवारपासून सुरू झाले. त्यानंतर नागोठणे, चणेरा, घोसाळे, कोलाड, मेढा, धाटाव, किल्ला विभागावर साखळी उपोषण होणार आहे. मंगळवारी सकाळी साखळी उपोषणाला सुरुवात झाली. यावेळी जेष्ठ नेते व्ही टी देशमुख, अध्यक्ष प्रदीप देशमुख, विजय मोरे, विनोद पाशिलकर, समीर शेडगे, नितीन परब, राजेश काफरे, महेश सरदार, प्रशांत देशमुख, प्राजक्ता चव्हाण,रत्नप्रभा काफरे, स्वरांजली शिर्के, समीक्षा बामणे, मयुरा मोरे, निलेश शिर्के, अमित उकडे, मयूर पायगुडे आदी नेतेगण व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माणगावमध्ये रास्तारोको आंदोलन
एक मराठा-लाख मराठा, एकच मिशन मराठा आरक्षण गुरुवार दि.2 रोजी सकाळी 10 वाजता माणगावात बस स्थानकासमोर मुंबई-गोवा महामार्गावर आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज बांधव माणगाव तालुका यांच्यावतीने रास्तारोको आंदोलन गरजवंत मराठ्यांच्या लढ्यासाठी करण्यात येणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यामध्ये आला आहे. मागील 8 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसले आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासंदर्भात माणगाव तालुका सकल मराठा समाज बांधवांची सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. सदर सभेत जमलेल्या सकल मराठा समाज बांधवांनी अत्यंत तीव्र भावना व्यक्त करून मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा म्हणून आज गुरुवारी माणगाव बस स्थानकासमोर मुंबई-गोवा महामार्ग येथे रास्ता रोको आंदोलन सकल मराठा समाजातर्फे करण्यात येणार आहे, तरी माणगाव तालुक्यातील सकल मराठा समाजबांधवांनी या रास्तारोको आंदोलनास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाज माणगाव तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे.
माथेरानमध्ये मेणबत्ती मोर्चा
मराठा आरक्षणासाठी व आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी माथेरान शहर सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी संध्याकाळी सात वाजता मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला होता. येथील हुतात्मा स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापर्यंत रॅली काढण्यात आली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्राणांतिक उपोषणाला बसले आहेत.त्यांना पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने मोर्चे, आंदोलने, उपोषणे केली जात आहेत.या आरक्षणाची धग सर्व राज्यभर पसरली आहे. तर याचाच एक भाग म्हणून माथेरान सकल मराठा समाजबांधवांकडून मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. हुतात्मा स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अशी ही रॅली काढण्यात आली.यावेळी महिला,तरुण तरुणींचा सहभाग हा मोठया प्रमाणावर होता.
माथेरानमधील गुजराती समाज मुस्लिम समाज तर येथील बोहरा समाज, संत रोहिदास चर्मकार समाज, कोकनवासिय समाज,धनगर समाज, धोबी समाज अश्या सर्वच समाजबांधवांनी आपला पाठिंबा यावेळी दर्शविल तसेच रॅलीमध्ये सहभागी होऊन सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविले.