नव्या गटविकास अधिकाऱ्यांची खडतर परीक्षा

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| उरण | वार्ताहर |

उरण पंचायत समितीचे नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांच्यासमोर गावागावात विळखा घातलेल्या भ्रष्टाचाराच्या राक्षसाला ठार मारण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

तालुक्यातल्या बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये विकासाच्या नावावर लूट सुरू आहे. तक्रारदारांनी माहिती अधिकार कायद्यातून विचारलेल्या प्रश्नांना ग्रामपंचायती थातुरमातुर उत्तरं देत आहेत. मंत्रालयातून चौकशीचे आदेश व अहवाल सादर करण्याचे निर्देश देऊनही आजवर एकाही भ्रष्टाचाऱ्याला वेटोळे घातले गेले नाही. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर, दिनेश म्हात्रे, घन:श्याम कडू आणि अनेक गावकऱ्यांनी दिलेल्या तक्रारींची फाईल उरण पंचायत समितीत धुळखात पडली आहे. ज्यांच्याविरुद्ध तक्रार आहे, तेच ग्रामसेवक आणि सरपंच चौकशी अधिकाऱ्यांच्या गोटात उठबस करताना दिसत आहेत. तसेच, ग्रामसेवक गावात कमी, मात्र उरणच्या कार्यालयात रोज हजेरी लावत असतात. त्यामुळे उरण तालुक्याला लागलेली भ्रष्टाचाराची कीड उपटून फेकण्याचे मोठे काम गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांच्या हातात आहे. ते या विळख्यातून उरणची सुटका करतील का, की जैसे थे परिस्थिती कायम राहील? हा प्रश्न आता उरण तालुक्यातील प्रत्येक गावकऱ्यांकडून विचारला जात आहे.

Exit mobile version