पर्यावरण, पर्यटन जिल्ह्याचे दोन मानबिंदू

जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांचे उद्गार
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्याचे ‘प’ म्हणजे पर्यावरण आणि पर्यटन हे दोन मानबिंदू आहेत. हे दोन्ही मानबिंदू सक्षम करण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत. जिल्ह्याचा आर्थिक स्तर वाढविण्यासाठी कर्ज पतपुरवठा करणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्याचा आर्थिक स्तर वाढला तर विकास साध्य करणे शक्य होईल, असे मत जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे, महसूल तहसीलदार सचिन शेजाळ उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील विविध विषयांवर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
रायगड जिल्ह्यासाठी 2021-22 यावर्षासाठी 4 हजार 829 कोटीं पत पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी 1 हजार 961 कोटी, तर कृषी आणि कृषीपूरक उद्योगांसाठी 850 कोटी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली. राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज पुरवठ्यावर भर द्यावा, असे निर्देशही दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे पर्यावरण आणि पर्यटन याची सांगड घातली तर जिल्ह्याची उद्योगाच्या माध्यमातून वृद्धी होऊ शकते. त्यामुळे त्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत.
महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी

मेपूर्वी पुनर्वसन करणार
तळीये येथील आपद्ग्रस्त 263 कुटुंबांचे मे महिन्यापूर्वी पुनर्वसन केले जाईल. त्यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. पुनर्वसनासाठी आवश्यक 17 हेक्टर खासगी जागा संपादित केली जात आहे. म्हाडा मार्फत प्रत्येकी 600 चौरस फुटाची घरे बांधून दिली जाणार आहे. केवनाळे आणि साखरसुतारवाडी येथील 200 घराच्या पुनर्वसनासाठी जागा निश्‍चित झाली असून, पुनर्वसनासाठी कोटक फायनान्स आणि टाटा कंपनीने सहकार्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार करण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या दरडग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसनही केले जाणार आहे

Exit mobile version