पिरवाडी किनाऱ्यावर पर्यटनास बंदी

ग्रामपंचायतीकडून धोक्याचा इशारा

| उरण | वार्ताहर |

पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने सुरक्षेच्या कारणाने नागरीक आणि पर्यटकांनी किनाऱ्यावर येऊ नये आशा सूचना स्थानिक ग्रामपंचायतीने दिल्या आहेत. त्यासाठी परिसरात धोक्याचा इशारा देणारे फलकही लावण्यात आले आहेत.

पिरवाडी किनाऱ्यावर सुट्टीच्या दिवशी पावसाळ्यात ही मोठया प्रमाणात पर्यटक येतात. यातील अनेक पर्यटकांना समुद्राच्या पाण्याचा व लाटांचा अंदाज नसतो, त्यामुळे समुद्रात बुडण्याची शक्यता असते. अशा घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यातच जुलै महिन्यातील भरतीच्या वेळी प्रचंड लाटा उसळत असल्याने या धोकादायक परिस्थितीतही जीवाला धोका निर्माण होत असल्याने पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या स्थानिक नागरीक व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नागाव ग्रामपंचायतीने सूचना फलक लावले आहेत. त्याचे पालन करण्याचे आवाहन सरपंच चेतन गायकवाड यांनी केले आहे. त्याचप्रमाणे नवीमुंबई पोलीसांच्या सागरी सुरक्षा विभागाचे सुरक्षा कर्मचारी ही तैनात करण्यात आले आहेत. मात्र सुट्टीच्या दिवशी पिरवाडी किनाऱ्यावर मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. त्यामुळे वाहनांची तुफान गर्दी होते.

Exit mobile version